गव्हर्नर रघुराम राजन यांचा आग्रह
भारतीय अर्थव्यवस्थेला भक्कम व जोशपूर्ण बँकिंग व्यवस्थेची गरज असून हे क्षेत्र अधिक विकसित होण्याची आवश्यकता आहे; म्हणूनच येणाऱ्या काही वर्षांमध्ये देशात आणखी काही बँका सुरू झालेल्या दिसतील, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी येथे सांगितले.
भारत दौऱ्यावर आलेल्या सिंगापूरचे पंतप्रधान थर्मन षण्मुगारत्नम यांच्याशी संवादाचा कार्यक्रम बुधवारी भारतीय औद्योगिक महासंघाने (सीआयआय) मुंबईत योजला होता त्यावेळी गव्हर्नर बोलत होते.
भारतातील बँकिंग व्यवस्था अधिक भक्कम करण्याची आवश्यकता असून त्यामुळे एकूण अर्थव्यवस्थाही सुदृढ होईल, असे नमूद करत गव्हर्नरांनी बँकिंगच्या आगामी प्रवासाबाबत भाष्य केले. बँक क्षेत्रात सुधारणांच्या हेतूनेच भविष्यातील नव्या बँकांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे स्पष्ट करत या सर्व नव्या बँकांचा शिरकाव हा उल्लेखनीय असेल, असा राजन यांनी विश्वास व्यक्त केला.
पूर्णवेळ बँकिंग आणि दीर्घावधीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या या नव्या बँका असतील. त्याचबरोबर अस्तित्वातील सध्याच्या बँकांचे स्थान अधिक भक्कम करण्याच्या हेतूने त्यांचे बुडीत कर्जाचे प्रमाण मार्च २०१७ पर्यंत शून्यावर आणण्यासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या वर्षी ११ पेमेंट व १० लघु-वित्त बँकांच्या उभारणीला प्राथमिक मान्यता दिली. पैकी काहींचे कार्य येत्या वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. नुकतेच पतधोरण जाहीर करताना आणखी काही बँकांना परवाने देण्याचे सूतोवाच गव्हर्नरांनी केले होते.

स्वनिर्मित संपत्तीबाबत संशय धोकादायक!
स्वनिर्मित संपत्तीच्या वैधतेबाबत संशयाचे वातावरण भविष्यात धोकादायक ठरू शकते, असा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी पनामा प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर बोलताना दिला. पनामा कागदपत्रांमध्ये नाव असलेल्यांच्या उद्यमशीलतेबाबत, संपत्तीबाबत शंका उपस्थित करणे गर असल्याचे त्यांनी सांगितले.