विकसित देशांसाठी लाभदायक ठरणारी आणि टाळ्या घेणारी सुलभ आर्थिक धोरणे राबवू नये, अशा शब्दात आपणच महत्त्वाचे पद भूषविलेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेवर रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी तोंडसुख घेतले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ राहिलेले व रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर असलेले डॉ. राजन यांचे नाव संस्थेच्या प्रमुखपदासाठी चर्चेत असतानाच त्यांनी हे भाष्य केले आहे. नाणेनिधीच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत येत्या जुलैमध्ये संपुष्टात येत असून नव्या नावाकरिता राजन यांची चर्चा आहे.
विदेशी धोरण विचारमंथन करणाऱ्या ‘गेटवे हाऊस’ या मंचातर्फे मुंबईत सोमवारी आयोजित जी-२० च्या सल्लागार बैठकीत ते बोलत होते. राजन हे तुर्की येथे होणाऱ्या नाणेनिधीच्या येत्या महिन्यातील बैठकीसही उपस्थित राहणार आहेत.
केवळ पाश्चिमात्य देशांचे हित लक्षात घेऊन राबविली जाणारी धोरणे ही भारतासारख्या विकसित देशांवर विपरित परिणाम करणारी ठरू शकतात, अशी भीती व्यक्त करतानाच नाणेनिधीने केवळ निवडकांच्या टाळ्या घेण्यासाठी सुलभ धोरणे राबवू नयेत, असेही डॉ. राजन यांनी सुचविले.
जागतिक स्तराचा विचार करून नाणेनिधीने सुलभ पत धोरणाबाबत विचार करावा, असे सांगत राजन यांनी संस्थेच्या धोरणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली.
आपण कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे बोट दाखवत नसून असे लगेच स्पष्ट करत राजन यांनी मात्र आपण अशा धोरणांना अटकाव करण्याच्या प्रयत्नात आहोत, असे नमूद केले. कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला त्या त्या देशाच्या स्तरावर मान्यता असते; त्याचा जागतिक स्तरावर थेट संबंध नसतो, असे ते म्हणाले.
संभाव्य उमेदवार डॉ. रघुराम राजन यांच्या नाणेनिधीला कानपिचक्या

केवळ पाश्चिमात्य देशांचे हित लक्षात घेऊन राबविली जाणारी धोरणे ही भारतासारख्या विकसित देशांवर विपरित परिणाम करणारी ठरू शकतात. नाणेनिधीने केवळ निवडकांच्या टाळ्या घेण्यासाठी सुलभ धोरणे राबवू नयेत. जागतिक स्तराचा विचार करून नाणेनिधीने सुलभ पत धोरणाबाबत विचार करावा. संस्थेच्या धोरणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
डॉ. रघुराम राजन