रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांच्या स्वागतासह सुरू झालेल्या शेअर बाजारातील तेजीच्या दौडीला शुक्रवारी राजन यांच्याकडून अनपेक्षित व्याजदर वाढीच्या पवित्र्याने कलाटणी दिली. सेन्सेक्स तब्बल ३८२.९३ अंशांनी (-१.८५%), तर निफ्टी १०३.४५ अंशांनी (-१.६९%) रोडावला. दोन्ही निर्देशांकांनी गेल्या तीन आठवडय़ात दाखविलेली ही सर्वात मोठी घसरण आहे. रुपयाचेही अवसान गळून पडले आणि प्रति डॉलर ४६ पैशांनी कमकुवत होत ते ६२.२३ पातळीवर घसरले.
गव्हर्नर राजन यांच्याबाबत सकारात्मकतेने गुरुवारी बाजारात उंचावलेल्या व्याजदराबाबत संवेदनशील असलेल्या बँका, वाहन उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातील समभाग मूल्यांनी शुक्रवारच्या व्यवहारात जोरदार आपटी घेतली. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या खासगी क्षेत्रातील बडय़ा बँकांच्या घसरणीनेच केवळ सेन्सेक्सला १२० अंशांनी खाली खेचणारा परिणाम दाखविला.
रिझव्र्ह बँकेच्या मध्य-तिमाही पतधोरण आढावा येण्याआधी सेन्सेक्स सकाळी ११ च्या सुमारास दिवसाच्या उच्चांकावर म्हणजे २०,६७७ पातळीवर होता, पण बँकिंग व्यवस्थेत कर्जावरील व्याजाचे दर वाढतील अशी पाव टक्क्यांची रेपो दर वाढीचा घोषणा झाल्यावर क्षणार्धात बाजारात घसरण सुरू झाली आणि काही मिनिटात सेन्सेक्स तब्बल ६२५ अंशांनी रोडावून पावणे बाराच्या सुमारास २००५१ अशा दिवसांच्या नीचांकपदाला पोहचला.
काल मात्र फेडरल रिझव्र्हच्या मंदीग्रस्त अमेरिकेच्या अर्थउभारीसाठी योजलेल्या रोखे खरेदी कार्यक्रम न गुंडाळण्याच्या निर्णयाने सेन्सेक्स ६८४.४८ अंश वधारला होता. त्या पाठोपाठ रिझव्र्ह बँकेकडून सकारात्मकतेच्या अपेक्षा बाळगणाऱ्या बाजाराच्या पदरी मात्र निराशाच आली.
गव्हर्नर राजन यांनी ४ सप्टेंबरला पदभार घेतल्यानंतर कालपर्यंत डॉलरमागे तब्बल आठ टक्क्यांनी वधारलेल्या रुपयानेही शुक्रवारी कमजोरी दाखविली. चलन बाजारातील अस्थिरतेला पायबंद म्हणून जुलैमध्ये योजण्यात बँकांच्या रोकड द्रवेतवर अंकुश घालणारे उपाय आंशिक स्वरूपात नवे गव्हर्नर राजन यांनी मागे घेतले.
तथापि सकाळी प्रति डॉलर ६१.८८ पर्यंत सुधारलेल्या स्थानिक चलनाची रिझव्र्ह बँकेच्या दरवाढीच्या निर्णय येताच ६२.६१ पर्यंत घसरगुंडी उडाली. व्यवहार सत्राच्या अखेरच्या टप्प्यात ते काहीसे सावरले आणि गुरुवारच्या तुलनेत ४६ पैशांच्या घसरणीसह ६२.२३ वर स्थिरावले.
राजन यांनी पतधोरण आढाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना, ‘रुपयाची सध्याची मजबूती ही सुखावणारी आहे, परंतु चलन अद्याप भक्कमपणे स्थिरावलेले नाही. ही स्थिरता येत नाही तोवर रुपयाच्या मिनिटागणिक हालचालीवर आपली करडी नजर असेल,’ असे स्पष्ट केले. रुपयाने राजन गव्हर्नरपदी येण्यापूर्वी २८ ऑगस्टला प्रति डॉलर ६८.८५ असा सार्वकालिक नीचांक दाखविला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा