एरवी आर्थिक मंदीतील प्रकल्प, क्षेत्रांमुळे बँकांची बुडीत कर्जे वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिल्ली येथील सहाव्या आर्थिक परिषदेच्या मंचावर प्रथमच वाढत्या शैक्षणिक कर्ज थकीताबाबतची धास्ती व्यक्त केली.
या समस्येसह, ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ प्रक्रियेत सुलभता, बँक खात्यांशी आधार संलग्नतेची प्रक्रिया आदींच्या निवारणासाठी सर्व वित्तीय नियामकांना एका छताखाली आणण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याचे राजन यांनी सांगितले.
ग्राहकांचे संरक्षण करणारे नियम तयार होत असून वर्षअखेपर्यंत त्याबाबतच्या सर्व नियमावली स्पष्ट होतील, असे गव्हर्नरांनी सांगितले. आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सर्वसमावेशकता यावरही त्यांनी या वेळी भर दिला.
शैक्षणिक कर्जदाराच्या बेरोजगारीच्या कालावधीत अधिस्थगन (कर्जफेड पुढे ढकलण्याचा कायदेशीर उपाय) सारखा पर्याय आपसूक तयार होणारी यंत्रणा विकसित केली जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी कर्जदाराला बँकांबरोबर वाटाघाटी करण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक कर्ज क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वाढत असलेल्या बुडीत कर्जाचे प्रमाण वाढले असून ही बाब चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण ही खरे तर महत्त्वाची गुंतवणूक असून त्याच्या सुलभ कर्जासाठी आधारसारखी यंत्रणा उपयोगी येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. ‘तुमचा ग्राहक जाणून घ्या’ प्रक्रिया सुलभ करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा