रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा अनपेक्षित निर्णय का घेतला, याबाबत सध्या चर्चा रंगलेली दिसत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेली टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची या टीकेला असणारी मूकसंमती हे राजन यांच्या पायउतार होण्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्याकडून हवा तसा पाठिंबा न मिळाल्यामुळेच राजन यांनी हे पद सोडल्याचे मत त्यांच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर कोण? 
याशिवाय, काही दिवसांपूर्वी एका दैनिकात प्रसिद्द झालेल्या वृत्तानुसार, राजन यांची गव्हर्नरपदाची सध्याची मुदत संपल्यानंतर या पदावर राजन यांची थेट नियुक्ती करण्याऐवजी सरकारकडून निवड समिती नेमण्यात येणार होती. त्यामुळे राजन यांना गव्हर्नरपदासाठी अर्ज करावा लागला असता. मात्र, आपल्याला अशाप्रकारे निवड समितीसमोर जाण्याची वेळ आल्यास गव्हर्नरपदाची प्रतिष्ठा खालावेल, असे राजन यांचे मत होते. तसेच सरकारचा आपल्याला पाठिंबा नसल्याचे उघड होईल. याशिवाय, पदावर कायम राहिले तरी आगामी दोन वर्षांच्या कालावधीतही सातत्याने टीका आणि वादांचा सामना करावा लागेल. या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांमध्ये राजन लोकप्रिय असले तरी सुब्रमण्यम स्वामी यांनी राजन हे ‘मानसिकरित्या अस्सल भारतीय’ नसल्याचा आरोप करत त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लावल्याचा आरोपही स्वामी यांनी केला होता. एकीकडे स्वामींनी आरोपांची राळ उठवली असताना मोदी सरकारतर्फे राजन यांचा बचाव करण्याचा कोणताही प्रयत्न होत नव्हता. त्यामुळेच राजन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अग्रलेख- अवदसा आठवली… 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा