इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर मार्क कार्नी यांच्यासह भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह एक विशेष कार्यदलात सामील झाले आहेत. जागतिक आर्थिक मंच(डब्ल्यूईएफ)ने जगभरातील वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी या कार्यदलाची स्थापना केली आहे.
जागतिक वित्तीय व्यवस्थेत मोजक्या उदयोन्मुख बाजार व्यवस्थांची भूमिका, तंत्रज्ञानात्मक नावीन्यता व त्यांची वित्तीय स्थिरता आणि वाढीच्या दृष्टीने भूमिका, देशोदेशींची नियामक व्यवस्था आणि पतधोरणांचा कल आणि मुख्यत: वित्तीय सेवा क्षेत्राची विश्वासार्हता या मुद्दय़ांभोवती या कार्यदलाने आपला अहवाल तयार करणे अपेक्षित आहे.
या कार्यदलात वित्तीय क्षेत्रातील काही बडय़ा नाममुद्रांचे प्रमुखही आहेत. बँक ऑफ अमेरिकाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मॉयनिहान आणि एचएसबीसीचे अध्यक्ष डग्लस फ्लिंट यांचाही समावेश आहे. सिटीग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल कोरबाट, ब्लॅकरॉक समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी लॉरेन्स फ्लिंक हेही कार्यदलाचे सदस्य असतील, असे डब्ल्यूईएफने प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सह-व्यवस्थापकीय संचालक मिन झू आणि हाँगकाँगच्या चिनी विद्यापीठाचे संशोधनवृत्ती प्राप्त अभ्यासक लिऊ मिंगकांग हेही सदस्य म्हणून कार्य करतील.
दावोस येथे गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या डब्ल्यूईएफच्या वार्षिक मेळाव्यात, तेथे जमलेल्या विविध तज्ज्ञ व उद्योजकांनी जागतिक अर्थव्यवस्थेला नव्याने उभारी देण्यात तंत्रज्ञानात्मक प्रगती, अधिक स्वयंचलितीकरणाला महत्तम भूमिका प्रदान करताना, चौथ्या औद्योगिक क्रांतीची हाक दिली आहे.
वित्तीय व्यवस्थेची विश्वासार्हता जोखणार..
जागतिक आर्थिक मंचाकडून स्थापित हे कार्यदल तंत्रज्ञानात्मक नावीन्यता व त्यांची वित्तीय स्थिरता आणि वाढीच्या दृष्टीने भूमिका, देशोदेशींची नियामक व्यवस्था आणि पतधोरणांचा कल आणि मुख्यत: वित्तीय सेवा क्षेत्राची विश्वासार्हता या मुद्दय़ांबाबत अभ्यास करेल.