रिझव्र्ह बँकेच्या २३ व्या गव्हर्नरपदासाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. पण १९३५ सालच्या रिझव्र्ह बँकेच्या स्थापनेपासून आजवर गव्हर्नरपदावर स्थानापन्न झालेल्या मंडळींकडे पाहिल्यास, आजवरच्या २२ गव्हर्नर्सपैकी १४ जणांना प्रशासकीय सेवांची पाश्र्वभूमी राहिली आहे, तर त्यातही १२ जणांनी अर्थमंत्रालयाचे मुख्यालय दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक ते मुंबईतील मिंट रोड असा प्रवास साधला आहे.
रिझव्र्ह बँकेचे १९३५ सालचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे पेशाने एक निष्णात बँकर होते, परंतु मुदतआधीच १९३७ मध्ये संपलेला त्यांचा कार्यकाळ वगळता, त्यानंतर १९७५ पर्यंत रिझव्र्ह बँकेच्या मिंट रोडस्थित मुख्यालयावर अधिकारपद गाजविणारे सलग १० गव्हर्नर हे सनदी अधिकारीच होते. १९७७ ते १९८५ हा अनुक्रमे आय. जी. पटेल आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या गव्हर्नरपदाचा नऊ वर्षांचा काळ हा अर्थतज्ज्ञ आणि बँक प्रमुखांचा म्हणता येईल. डॉ. सिंग यांच्यानंतर अलाहाबाद बँकेचे माजी अध्यक्ष आलेले अमिताव घोष यांच्या रूपाने गव्हर्नरपद व्यावसायिक बँकरकडे आले, पण त्यांची कारकीर्द महिनाभरातच आटोपली. तर त्या आधीचे १३ वे गव्हर्नर एम. नरसिंह्मन हे रिझव्र्ह बँकेतील कोणा अधिकाऱ्याने गव्हर्नरपदापर्यंत मजल मारण्याचे एकमेव उदाहरण आहे. पण त्यांची कारकीर्दही जेमतेम सात महिन्यांतच संपुष्टात आली. त्या पुढे आर. एन. मल्होत्रा आणि एस. वेकिंटारमण या माजी प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांचा १९८५ ते १९९२ अशा कार्यकाळाचा राहिला. पुढे डॉ. सी. रंगराजन आणि डॉ. बिमल जालान या दोन अर्थतज्ज्ञांनी या प्रवाहाला खंड जरूर पाडला, तर पुन्हा २००३ पासून गव्हर्नरपदावरवाय. व्ही. रेड्डी व त्या पाठोपाठ मावळते गव्हर्नर डी. सुब्बराव या सलग दोन सनदी अधिकाऱ्यांच्या सत्तेचा राहिला.
नवे गव्हर्नर राजन हे प्रशासकीय सेवा अधिकारी (आयएएस) नसले तरी प्रशासनात कार्यरत राहिले आहेत, तथापि त्यांची खरी ओळख ही अर्थतज्ज्ञ अशीच आहे.
रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून माझे नाव निश्चित होणे हा मी मोठा सन्मान समजतो. अर्थव्यवस्थेसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार आणि रिझव्र्ह बँक एकत्रित कार्य करतील. एका रात्रीत अर्थव्यवस्थेतील संकटे नाहीशी होणार नाहीत. मात्र त्यांचा विश्वासाने सामना नक्कीच करता येईल.
’ डॉ. रघुराम राजन
(गव्हर्नरपदी नियुक्तीच्या घोषणेनंतर)
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सरकारची सवरेत्कृष्ट निवड.
* सी. रंगराजन (पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार)
अच्युत्तम अनुभव असणारी व्यक्ती आणि सवरेत्कृष्ठ अर्थतज्ज्ञ.
* डॉ. बिमल जालान
(रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर)
अर्थातच पात्र आणि लोकप्रिय अर्थतज्ज्ञ.
* डी. के. मित्तल (माजी बँकिंग सचिव)
राजन यांच्या नियुक्तीमुळे आनंद. माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा.
* डॉ. माँटेकसिंग अहलुवालिया
(नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष)
जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ. आगामी संकटांसाठी अशीच भक्कम व्यक्ती हवी.
* राकेश मोहन
(रिझव्र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर)
योगायोग..राजन आणि रुपयाचा!
* मावळते गव्हर्नर सुब्बराव यांची कारकीर्द महिनाभरात संपुष्टात येत आहे, तोच जाता जाता डॉलरच्या तुलनेत रुपयाने व्यवहारात नवनवे ऐतिहासिक नीचांक दाखविले. मंगळवारी सकाळच्या सत्रातच चलन ६१ पल्याड गेले. दुपारी डॉ. रघुराम राजन यांचे रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून नाव जाहीर झाले तोवर रुपयाने ६१.४० असा नवा तळ गाठला. तर दुपानंतरही त्याची खोली ६१.८१ पर्यंत विस्तारत गेली. पण त्यापुढे मात्र त्याने नाटय़मय कलाटणी घेतली. २००८ च्या आर्थिक मंदीत पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून यशस्वी भूमिका निभावणारे राजन यांच्याकडून रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून रुपयाच्या नियंत्रणाबद्दल केली जाणारी अपेक्षा जणू सार्थ ठरवीत दिवसअखेर चलनही तेजीसह स्थिरावले. कालच्या तुलनेत त्यात प्रति डॉलर ११ पैशांची कमाई करीत रुपया ६०.७७ पर्यंत उंचावला. विद्यमान गव्हर्नरांनी रोकड-तरलता नियंत्रणाचे कडवे उपाय योजूनही रुपयाच्या घसरणीला आळा घालण्यात फारसे यश मिळविता आलेले नाही. यापूर्वी महागाई आटोक्यात आणण्यासाठीही त्यांनी पतधोरणाच्या माध्यमातून व्याजदर कपातीसाठी आखडता हात घेतला आहे. चलनाने यापूर्वी व्यवहारातील ६१.२१ (जुलै) हा तर व्यवहार बंद होताना ६१.१० (२ ऑगस्ट) असा नीचांक नोंदविला आहे. चलन जानेवारीपासून आतापर्यंत ९.५६ टक्क्यांनी कमकुवत झाले आहे. त्यातील घसरण २५ मेपासून सतत नोंदली जात आहे.