रिझव्र्ह बँकेच्या २३ व्या गव्हर्नरपदासाठी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. पण १९३५ सालच्या रिझव्र्ह बँकेच्या स्थापनेपासून आजवर गव्हर्नरपदावर स्थानापन्न झालेल्या मंडळींकडे पाहिल्यास, आजवरच्या २२ गव्हर्नर्सपैकी १४ जणांना प्रशासकीय सेवांची पाश्र्वभूमी राहिली आहे, तर त्यातही १२ जणांनी अर्थमंत्रालयाचे मुख्यालय दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक ते मुंबईतील मिंट रोड असा प्रवास साधला आहे.
रिझव्र्ह बँकेचे १९३५ सालचे पहिले गव्हर्नर सर ओसबोर्न स्मिथ हे पेशाने एक निष्णात बँकर होते, परंतु मुदतआधीच १९३७ मध्ये संपलेला त्यांचा कार्यकाळ वगळता, त्यानंतर १९७५ पर्यंत रिझव्र्ह बँकेच्या मिंट रोडस्थित मुख्यालयावर अधिकारपद गाजविणारे सलग १० गव्हर्नर हे सनदी अधिकारीच होते. १९७७ ते १९८५ हा अनुक्रमे आय. जी. पटेल आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या गव्हर्नरपदाचा नऊ वर्षांचा काळ हा अर्थतज्ज्ञ आणि बँक प्रमुखांचा म्हणता येईल. डॉ. सिंग यांच्यानंतर अलाहाबाद बँकेचे माजी अध्यक्ष आलेले अमिताव घोष यांच्या रूपाने गव्हर्नरपद व्यावसायिक बँकरकडे आले, पण त्यांची कारकीर्द महिनाभरातच आटोपली. तर त्या आधीचे १३ वे गव्हर्नर एम. नरसिंह्मन हे रिझव्र्ह बँकेतील कोणा अधिकाऱ्याने गव्हर्नरपदापर्यंत मजल मारण्याचे एकमेव उदाहरण आहे. पण त्यांची कारकीर्दही जेमतेम सात महिन्यांतच संपुष्टात आली. त्या पुढे आर. एन. मल्होत्रा आणि एस. वेकिंटारमण या माजी प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांचा १९८५ ते १९९२ अशा कार्यकाळाचा राहिला. पुढे डॉ. सी. रंगराजन आणि डॉ. बिमल जालान या दोन अर्थतज्ज्ञांनी या प्रवाहाला खंड जरूर पाडला, तर पुन्हा २००३ पासून गव्हर्नरपदावरवाय. व्ही. रेड्डी व त्या पाठोपाठ मावळते गव्हर्नर डी. सुब्बराव या सलग दोन सनदी अधिकाऱ्यांच्या सत्तेचा राहिला.
नवे गव्हर्नर राजन हे प्रशासकीय सेवा अधिकारी (आयएएस) नसले तरी प्रशासनात कार्यरत राहिले आहेत, तथापि त्यांची खरी ओळख ही अर्थतज्ज्ञ अशीच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा