जगभरात मध्यवर्ती बॅंकांची सध्याची अयोग्य धोरणेच अर्थव्यवस्थेला १९३० सारख्या मंदीच्या स्थितीकडे नेतील. अशा प्रकारची धोरणे बॅंकांनी १९३०च्या मंदीच्या काळात राबविली होती, अशी भीती रिझव्‍‌र्ह बॅंकेने व्यक्त केली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी गेल्या आठवडय़ात महामंदीची शक्यता व्यक्त केली होती. मात्र जगात तशी स्थिती नाही, असा निर्वाळा रिझव्‍‌र्ह बॅंकेने दिला आहे.
लंडन येथे व्यवसाय व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना डॉ. राजन यांनी गुरुवारी १९३० च्या जागतिक आर्थिक महामंदीचा उल्लेख केला होता. मात्र जगभरातील अर्थव्यवस्था आता योग्य मार्गावर वाटचाल करीत आहेत. जागतिक अर्थव्यवस्था तूर्त प्रगतिपथावरच राहील. युरो झोनमधील अस्थिरता हे एक संकट आहे. मात्र तेही लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जग महामंदीत जाईल, असा अर्थ काढणे चूक आहे. जगाच्या तुलनेत भारताची स्थिती वेगळी आहे. रिझव्‍‌र्ह बॅंकेचे त्याकडे बारीक लक्ष असून, गुंतवणुकीला चालना देण्यासाठीच दरकपातीसारखी पावले उचलली जात आहे, असेही मत बॅंकेने व्यक्त केले आहे.  जागतिक बँकांनी नव्या नियमांची चौकट आखली पाहिजे आणि त्यासाठी पूरक स्थितीही तयार होत आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यपद्धतीत समन्वयाची आवश्यकता आहे. नव्या नियमांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडामोडी घडण्यापेक्षा त्यासाठी अधिक संशोधन आणि कृती होणे आवश्यक आहे, यावर पुन्हा भर देण्यात आला आहे, असेही रिझव्‍‌र्ह बॅंकेने म्हटले आहे.
आयातीवरील स्वत:चे अवलंबित्व कमी करताना अनेक देश निर्यात मागणी वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत; परिणामी निर्यात स्वस्त करण्यासाठी या देशांनी स्थानिक चलनाचे अवमूल्यन करून घेतले आहे, असे विविध देशांच्या भूमिकेबाबतचे स्पष्टीकरण रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहे.
१९३० सारखी महामंदीसदृश स्थिती येऊन ठेपल्याचे राजन यांचे मत नव्हते. मात्र त्यानंतर जगभरातील अनेक मध्यवर्ती बॅंकांनी राबविलेली धोरणे ही अक्षरश: ‘शेजाऱ्याकडून घेऊन भिकाऱ्याला देण्यासारखी’ होती, असे त्यांना म्हणावयाचे होते. राजन यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan on world facing great depression