सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजाराचे निर्देशांक आणि चलन बाजारात रुपयाने तेजी नोंदविली. मध्यवर्ती बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून धुरा हाती घेताना रघुराम राजन यांच्या घोषणांनी नकारार्थी बनलेल्या बाजार भावनांना कलाटणी दिली, इतकेच नव्हे तर सेन्सेक्स व निफ्टीने दोन टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवून त्यांना उत्साही दादही दिली.
दिवसभरात ५५० अंशांची मजल मारत १९ हजाराला गाठणारा सेन्सेक्स गुरुवारअखेर ४१२.२१ अंशांची वाढ नोंदवून १८,९७९.७६, तर १४४.८५ अंश वाढ नोंदवित निफ्टी ५,५९२.९५ वर पोहोचला. निफ्टीनेही सत्राच्या प्रारंभीच्या तासातच ५६०० ही तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची पातळी ओलांडली, परंतु दिवसअखेर मात्र या पातळीने या निर्देशांकाला हुलकावणी दिली.
सलग दुसऱ्या दिवसाच्या तेजीने भांडवली बाजार तीन आठवडय़ाच्या उच्चांकाला गवसणी घालत असतानाच रुपयानेही सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवित १०० पैशांची उसळी घेत डॉलरच्या तुलनेत ६६ पर्यंत मजल मारली. दिवसभरात ६५.५४ या उच्चांकावर गेलेले चलन दिवसअखेर १०६ पैशांनी भक्कम होत ६६.०१ वर स्थिरावले.
रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या स्वागतात कालपासून (कालची भर ३३३ अंशांची) उत्साहाचे भरते आलेला सेन्सेक्स आज व्यवहाराच्या सुरुवातीलाही तब्बल ५०० अंशांची वाढ नोंदवित होता. त्याला संसदेत बुधवारी संमत झालेल्या निवृत्तिवेतन विधेयकाची जोड मिळाल्याने तर मुंबई निर्देशांक दिवसभरात ५५० अंशांची झेप घेत थेट १९ हजार पार करता झाला. व्यवहारात १९,११७.५२ असा वरचा टप्पा गाठल्यानंतर दिवसअखेर सेन्सेक्स १४ ऑगस्टच्या समकक्ष पातळीवर पोहोचला. १४ ऑगस्टला सेन्सेक्स १९,३६७.५९ वर होता.
रिझव्र्ह बँकेचे नेतृत्व राजन यांच्याकडे येत असतानाच बँक तसेच बांधकाम क्षेत्राशी निगडित त्यांनी जाहीर केलेल्या नव्या उपाययोजनांमुळे भांडवली बाजारात बँक, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू समभागांचे मूल्य उंचावले. जोडीला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनाही मागणी राहिली. प्राथमिक अंदाजानुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १७२.५३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे मानले जाते.
रोखे परतावा नरमला!
दहा वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवरील व्याजदर बुधवारी काहीसा नरमले. गेल्या काही सत्रांमध्ये वधारलेल्या या दरांची नफेखोरी झाल्याने दरांमध्ये घसरण नोंदली गेली. ०.३० टक्क्याने दर खाली येत ते ८.४२%वर विसावले. गुरुवारच्या व्यवहारात ८.१६% पर्यंत रोडावलेले व्याजदर काही दिवसांपूर्वीच ९.५० टक्क्यांपर्यंत गेले आहेत.
सोने-चांदीत उतार
सराफा बाजारात मौल्यवान धातूंचे दर घसरणीला लागले आहेत. बुधवारी मुंबईत सोने तोळ्यामागे ३८० रुपयांनी कमी होत ३१,५६० रुपयांपर्यंत खालावले, तर चांदीतही किलोमागे ५१५ रुपयांची घसरण होत ५५,८०० रुपयांचा भाव मिळाला. राजधानी दिल्लीत सोने दरांमध्ये आठवडय़ातील सर्वात मोठी आपटी अनुभवली गेली. तेथे सोन्याचा तोळ्यामागे भाव गुरुवारी रु.१,२५० नी घसरला.
बँक निर्देशांक भरधाव..
बँक आणि गृहकर्जदार कंपन्यांचे समभाग गुरुवारी रिझव्र्ह बँकेच्या सकारात्मक उपाययोजनांनी चांगलेच बहरले. नवीन खासगी बँक परवाने, नव्या शाखा तसेच गृहकर्जासाठीच्या रिझव्र्ह बँकेच्या सूचना या उद्योगासाठी फायदेशीर ठरण्याच्या वृत्ताने बँक निर्देशांक आघाडीवर राहिला. एकूणच सूचीबद्ध बँकांनी दिवसअखेर २१ टक्क्यांपर्यंत मूल्य वाढ नोंदविली, तर बँक परवान्यांसाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांचे समभाग मूल्य ७.८ टक्क्यांनी उंचावले.
आघाडीच्या बँका
येस बँक : + २१.५५%
अॅक्सिस बँक : +१५.६३%
फेडरल बँक : +१२.३८%
आघाडीच्या बँक अर्जदार
बजाज फायनान्स : +७.६१%
रिलायन्स कॅपिटल : +६.६५%
आयडीएफसी : +६.१९%
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा