भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षांत वाढली असून विकसनशील देशांमध्ये भारताचा प्रवास हा उत्तम राहिला आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच विकसित देशांमार्फत उचलले जाणाऱ्या उपाययोजनांमुळे मात्र काहीशी चिंतेचे वातावरण अद्यापही कायम आहे, असे प्रतिपादन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केले आहे. मध्यवर्ती बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या वित्तीय स्थिरता अहवालात मात्र गव्हर्नरांनी भारतासारख्या संवदेनशील अर्थव्यवस्थेच्या नकाशावर बँकांच्या वाढत्या बुडित कर्जाचे बिंदू अद्यापही दु:खदायक असल्याचे म्हटले आहे. बँकांची कमकुवत मालमत्ता आणि ती चांगली राखण्याची कसरत हे नियामकांबरोबरच सरकारसाठीदेखील आव्हान असल्याचेही डॉ. राजन यांनी म्हटले आहे.
२०१५ चा वित्तीय स्थिरता अहवाल रिझव्र्ह बँकेने गुरुवारी उशिरा जाहीर केला. यात भारताच्या ताज्या अर्थस्थितीतीबाबत भाष्य करतानाच अर्थस्थितीतीपुढील आव्हानांचाही उल्लेख करण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा गेल्या काही महिन्यांचा प्रवास आशादायक राहिला असला तरी जागतिक घडामोडी त्यावर विपरित परिणामकारक ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हमार्फत मे २०१३ पासून व्याजदर वाढविण्याच्या हालचालींचा हवाला देण्यात आला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था प्रगतीच्या प्रवासावर असून आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा फटका सहन करण्यासाठी आपले आर्थिक मुलभूत तत्त्वेही भक्कम आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय बँक व्यवस्थेतील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण मार्च २०१५ अखेर ४.६ टक्क्य़ांवर गेले आहे. ही स्थिती अद्यापही तिच्या तळातून बाहेर आलेली नाही, असे स्पष्ट करणाऱ्या या अहवालात मालमत्ता गुणवत्तेचा ऱ्हास आणखी काही तिमाहींसाठी अनुभवला जाऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
‘ब्रिक्स बँके’चे कामकाज नव्या आर्थिक वर्षांपासून
ब्रिक्स बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘न्यू डेव्हलपमेन्ट बँके’चे कामकाज एप्रिल २०१६ पासून सुरू होईल, अशी माहिती नव्या बँकेचे पहिले अध्यक्ष के. व्ही. कामत यांनी गुरुवारी मुंबईत दिली. ‘सीआयआय’च्या वार्षिक परिषदेला उपस्थित कामत यांनी या बँकेच्या निमित्ताने भारतातील काही प्रकल्पांना वित्त सहाय्याच्या दृष्टीने आपण सरकारशी चर्चा करत असल्याचे सांगितले. जागतिक बँक, एशिया डेव्हलपमेंट बँक यांच्यापेक्षा ब्रिक्स बँकेचे कार्य भिन्न असेल, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा