रिझव्र्ह बँकेची दर स्थिरता; आधीच्या कपातीचे लाभ कर्जदारांपर्यंत पोहचत नसल्याबद्दल खंत
महागाईतील संभाव्य वाढीपोटी दक्षता बाळगत, स्थिर व्याजदराचे पाऊल उचलावे लागलेल्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या उभारीचे सुस्पष्ट संकेत मिळत असल्याचे प्रतिपादन मंगळवारी येथे केले. मात्र असे असूनही रेपो दरातील १.२५ टक्का कपातीचे निम्म्याने लाभही कर्जदारांपर्यंत बँकांनी पोहोचविले नसल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त केली.
आणखी दोन महिने महागाईचा दर उंचावता राहणार असून त्याबाबत मध्यवर्ती बँक अधिक दक्ष असल्याचे चालू आर्थिक वर्षांच्या पाचव्या द्विमासिक पतधोरणात रिझव्र्ह बँकेने सांगितले. या पतधोरणात रेपो दरासह सर्व प्रमुख व्याजदर स्थिर ठेवण्याचे अपेक्षित पवित्राच मध्यवर्ती बँकेने दाखविला. तथापि गव्हर्नरांनी देशातील महागाई दराबाबत तसेच अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबतचा आपला यापूर्वीचाच अंदाज कायम ठेवला.
तुटीच्या व अनियमित मान्सूनचा परिणाम कृषी उत्पादनावर होण्यासह रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणासाठी आवश्यक किरकोळ महागाई दर आणखी वाढण्याची भीती राजन यांनी व्यक्त केली. जानेवारी २०१६ पर्यंतचे महागाई दराचे लक्ष्य ६ टक्के आहे आणि मार्च २०१७ मध्ये ते ५ टक्क्यांचे आहे. मात्र नजीकच्या जानेवारीतील अपेक्षित पातळीपल्याड महागाई भडकण्याचे संकेत त्यांनी दिले.
याचबरोबर रिझव्र्ह बँकेच्या आगामी पतधोरणातील कल हा सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, अमेरिकी फेडरल रिझव्र्हची महिनाअखेरची बैठक तसेच मोदी सरकारचा आगामी अर्थसंकल्प यावर निर्भर असेल, असेही राजन यांनी सुचविले. २०१५ मध्ये रिझव्र्ह बँकेने आतापर्यंत १.२५ टक्का दर कपात केली आहे. चालू वर्षांतील शेवटची व्याजदर कपात सप्टेंबर २०१५ मध्ये अध्र्या टक्क्याची झाली आहे. बँकेचे आगामी पतधोरण २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.
ऑक्टोबरमधील ५ टक्के नोंदलेला किरकोळ महागाई दर हा गेल्या चार महिन्यातील सर्वोच्च राहिला आहे. तर घाऊक महागाई दर अद्यापही उणे स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन उंचावत ७.४ टक्क्यांवर गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा