पंतप्रधानांची संकल्पना असलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवर हल्ला चढविताना रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरांनी सर्वच देशांनी गुंतवणुकीसाठी येथेच लक्ष केंद्रित करावे असे या मोहिमेचे सरसकट रूप असू नये, असे सुचविले.
दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असलेल्या डॉ. रघुराम राजन यांनी गुरुवारी श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित केले.  ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा पाठपुरावा हा महत्त्वाकांक्षा व लाभदायी असली तरी त्या द्वारे समस्त जगासाठी तिचा उपयोग चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.
जागतिक मंदीने समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त  करत यापेक्षा भारतातील निर्मिती व सेवा क्षेत्राची वाढ कशी होईल हे पाहणे गरजेचे ठरेल, असे राजन यांनी सांगितले. या क्षेत्रासाठी पूरक वातावरण तयार करण्यासह रोजगारवाढीवरही त्यांनी भर दिला. आपण कोणासाठी वस्तूची निर्मिती करतो यावर लक्ष देण्याऐवजी देशांतर्गत पायाभूत सेवा उभारण्यासह व्यवसायपूरक नियमन करून चांगले मानवी भांडवल उभे करणे हे लक्ष्य असले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
‘मेक इन इंडिया’चे लक्ष केवळ बाहेरील देशांसाठीच असू नये तर आपणही जगासाठी उत्तम निर्मिती करणे आवश्यक आहे, असे गव्हर्नर म्हणाले. जागतिक बाजारात मंदी असेल तर वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी नसेल, असेही त्यांनी निदर्शनास आणले.
सप्टेंबर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेबाबत गव्हर्नरांनी यापूर्वीही आक्षेप घेतला होता.

Story img Loader