पावसाबाबत दाटलेली अनिश्चितता, परिणामी महागाईवाढीची संभाव्य शक्यता असतानाही, रिझव्र्ह बँकेने मंगळवारी द्विमाही पतधोरण आढाव्यात, बँकांकडून कर्जदारांना व्याजदर कपातीचा दिलासा देता येईल, अशी रेपो दरात पाव टक्क्यांच्या कपातीची घोषणा केली. तथापि चालू वर्षांत तिसऱ्यांदा झालेल्या एकूण पाऊण टक्क्यांच्या या रेपो दरात कपातीचा लाभ आपल्या ग्राहकांपर्यंत बँकांकडून पोहोचविला जावा, असे पुन्हा एकदा आवाहन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना बँकांना उद्देशून करावे लागले.
देशांतर्गत क्षमतांचा दिसून येत नसलेला वापर, आर्थिक उभारीबाबत अद्याप धूसर असलेले संकेत, डळमळलेली गुंतवणूक आणि कर्ज मागणीची परिस्थिती ही व्याजदर कपातच सुचविणारी आहे, असे आपल्या भूमिकेचे समर्थन करताना गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले.
ज्या दराने रिझव्र्ह बँकेकडून देशातील वाणिज्य बँकांना अल्पमुदतीत कर्ज अदा केले जाते तो रेपो दर सध्याच्या ७.५ टक्क्यांवरून आणखी पाव टक्क्यांनी कमी ७.२५ टक्क्यांवर आणण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. तर वाणिज्य बँकांना आपल्या एकूण ठेवींपैकी ज्या प्रमाणात निधी रिझव्र्ह बँकेकडे राखून ठेवावा लागतो ते रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) आणि सरकारी रोख्यांमध्ये बँकांना सक्तीच्या गुंतवणुकीचे बंधन असलेले वैधानिक तरलता प्रमाण (एसएलआर) अनुक्रमे ४ टक्के व २१.५ टक्क्यांवर स्थिर ठेवणारे पतधोरण जाहीर केले.
दृष्टिक्षेपात पतधोरण..
* रेपो दर पाव टक्क्यांनी घटून ७.२५ टक्क्यांवर; रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) ४ टक्क्यांवर स्थिर
* रेपो दर कपात सामान्य ग्राहकांपर्यंत संक्रमित करण्याचे बँकांना आवाहन
* महागाई दरात जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांवर वाढ अपेक्षित
* किंमतवाढीवर नियंत्रणासाठी अन्नधान्य वितरण व व्यवस्थापन यंत्रणेत सुदृढता आवश्यक
* चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पूर्वअंदाजित ७.८ टक्क्यांपेक्षा कमी ७.६ टक्के राहील.
* सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून उत्पादक कर्जवितरण वाढेल यासाठी त्यांचे लक्ष्याधारित भांडवलीकरण सरकारकडून व्हावे
* तिसरे द्विमासिक धोरण ४ ऑगस्ट २०१५ रोजी
चार बँकांकडून ऋण दर कपात!
मुंबई: रिझव्र्ह बँकेने रेपो दरात सलग तिसरी कपात केल्यानंतर बँकांनी त्याला प्रतिसाद देणे सुरू केले आहे. स्टेट बँकेसह अन्य काही बँकांनी त्यांचे किमान ऋण दर खाली आणले आहेत. मात्र हे चित्र विस्तारले जाईल किंवा त्याचा थेट लाभ गृह, वाहन आदी कर्जदारांपर्यंत पोहोचेल काय, असा प्रश्न आहे.
मंगळवारी सर्वप्रथम अलाहाबाद बँकेने तिचे दर ०.३० टक्क्याने कमी करत ९.९५ टक्क्यांवर आणले. यानंतर स्टेट बँकेनेही किमान दर ९.७० टक्क्यांपर्यंत आणून ठेवला आहे. स्टेट बँकेने गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत. बँकेची यंदाची कपात ०.१५ टक्क्याची आहे. दोनही बँकेच्या दर कपातीची अंमलबजावणी सोमवार, ८ जूनपासून होणार आहे. याच क्षेत्रातील देना व पंजाब अॅण्ड सिंध बँकेने त्याचे किमान ऋण दर पाव टक्क्याने कमी करत ते आता १० टक्क्यांच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहेत. यामुळे उपरोक्त बँकांचे गृह, वाहन, शैक्षणिक कर्ज व्याज दर कमी होण्यास वाव आहे. रिझव्र्ह बँकेने २०१५ मध्ये आतापर्यंत तिसऱ्यांदा दर कपात केली आहे. असे करताना प्रत्येक वेळी पाव टक्क्याची दर कपात करण्यात आली आहे.