तमाम अर्थव्यवस्था बिकट स्थितीत असून सध्याचा कालावधी हा मोठय़ा आव्हानांनी ओतपोत आहे, असे पहिले मत गव्हर्नर म्हणून डॉ. राजन यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती बँक म्हणून केवळ महागाई नव्हे तर विकासालादेखील पतधोरण राबविताना समोर ठेवले जाईल, अशी ग्वाही देत डी. सुब्बराव यांच्यापेक्षा निराळा ‘अजेन्डा’ राजन यांनी वित्त माध्यमांसमोर मांडला.
सकाळी पदभार स्विकारल्यानंतर सायंकाळी माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी, ‘विद्यमान अर्थव्यवस्था विविध आव्हानांचा सामना करत असून हे चित्र फार काही सोपे नाही. महागाईवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच विकास आणि वित्तीय स्थिरतेला प्राधान्य दिले जाईल. रुपयात अधिक स्थिरता आणण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जातील,’ असा आपल्या तीन वर्षांचा कार्यपथ विशद केला.
बहुप्रतिक्षित अशा नव्या व तिसऱ्या फळीतील बँक परवान्याबाबत ते म्हणाले की, खासगी उद्योगांना नवे बँक परवाने जानेवारी २०१४ दरम्यान दिले जातील. बँक नियामकांच्या अटी आणि नियमांना अधीन राहून लवकरात लवकर पात्र अर्जदारांना परवाने दिले जातील. अर्जाची छाननी माजी गव्हर्नर बिमल जालन यांची समिती करेल. तसेच नव्या शाखा सुरू करण्यासाठी बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेच्या परवानगीची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या गव्हर्नरांच्या कारकिर्दीतील पहिले पतधोरण याच महिन्यात २० तारखेला जाहिर होणार आहे.

‘बॉस’ला सलाम!
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे २३ वे गव्‍‌र्हनर म्हणून राजन यांनी बुधवारी मावळते गव्हर्नर डी. सुब्बराव यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. या पदावरील नियुक्ती जाहिर झाल्यानंतर गेले महिनाभर ते या यंत्रणेचे कर्तव्यावरील अधिकारी म्हणून काम पाहत होते. दरम्यान सुब्बराव यांच्या अखेरच्या कालावधीपासून (२२ मे) सुरू असलेली रुपयातील घसरण राजन यांच्या हंगामी कालावधीतही सुरूच होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले ५० वर्षीय राजन हे मध्यवर्ती बँकेतील तरुण गव्हर्नरांसह बिगर सनदी अधिकारी ठरले आहेत.
राजन यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर ‘यापेक्षा अधिक सक्षम गव्हर्नर असणे नाही’ अशी पावती सुब्बराव यांनी दिली.
सकाळी ११ वाजताच  राजन यांचे ‘मिन्ट रोड’वर आगमन झाले. मुख्य के. सी. चक्रवर्तीसह पाच डेप्युटी गव्‍‌र्हनर राजन यांना घेण्यासाठी खाली उतरले. थेट गेटवरून त्यांचा ताफा मुख्यालय इमारतीत शिरण्यापूर्वी द्वारपालाने ‘नव्या साहेबां’ना सलामही ठोकला. चक्रवर्तीनी तेथेच ‘बॉस’ना पुष्पगुच्छ दिला.

Story img Loader