चालू हंगामात पाऊस-पाण्याची देशभरातील प्रगती आणि त्याचे शेती क्षेत्राच्या दृष्टीने परिणाम या संबंधाने अद्याप निश्चित काही सांगता येण्याची स्थिती नसून, ही बाब देशाची आगामी आर्थिक वृद्धी आणि महागाई दरासंबंधाने मोठय़ा जोखमीची आहे, असे रिझव्र्ह बँकेने २०१४-१५ सालच्या आपल्या वार्षिक अहवालात पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाने दुष्काळ-छायेची प्रारंभिक भीती नाहीशी केली असली, तरी तो सर्वत्र पुरेसा व संपूर्ण हंगामभर सुरू राहण्याबाबत आजही अनिश्चितता दाटली आहे, असे नमूद करीत मध्यवर्ती बँकेच्या अहवालाने, तुटीच्या पावसाच्या स्थितीचे विपरीत परिणाम आटोक्यात ठेवण्याच्या उपायांची गरजही व्यक्त केली आहे. अन्नधान्य व्यवस्थापनाची र्सवकष यंत्रणेसाठी आतापासून पुढाकार आवश्यक असल्याचे अहवालाचे म्हणणे आहे. रिझव्र्ह बँकेने मार्च २०१६ पर्यंत महागाईचा दर हा सहा टक्क्यांखाली राहील असे लक्ष्य राखले आहे. तथापि हे लक्ष्य गाठण्यासाठी तुटीचा पाऊस जोखमीचा ठरेल, असे अहवालाने सूचित केले आहे.
लक्ष्य व आव्हाने..
> ग्राहक किंमत निर्देशांक (महागाई दर) जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांखाली येईल.
> मार्च २०१८ पर्यंत महागाई दराचे ४ टक्के लक्ष्य राहील.
> चालू आर्थिक वर्षांअखेर चालू खात्यावरील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.५ टक्क्यांखाली येईल.
व्यापक अर्थस्थिरतेसाठी सरकार व रिझव्र्ह बँकेमार्फत
‘काम चालू असणारी’ तीन प्राधान्य क्षेत्रे
ल्ल आर्थिक वृद्धीचा स्तर देशाच्या नैसर्गिक क्षमतांच्या तुलनेत आजही खालच्या स्तरावर आहे, तो उंचावला पाहिजे.
> जानेवारी २०१६ साठी निश्चित केलेले महागाई दराच्या अपेक्षित मर्यादेच्या कमाल पातळीवर असून, तो खाली आणावयाचा आहे.
> बँकांना मुक्तपणे कर्जवितरण करण्याला वाढलेल्या थकीत कर्जामुळे बंधने आली आहेत, तर अनेक बँका नव्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या नादात, विद्यमान कर्जदारांकडून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर पाणी सोडू इच्छित नसल्याने व्याजाचे दर खाली आणण्यास कचरत आहेत. या दुष्टचक्राचे निवारण करावयाचे आहे.