अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली. कपातीनंतर रेपो दर साडेसात टक्क्यांवरून सव्वासात टक्क्यांवर येणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जाचे व्याजदर आणखी उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रोख राखीवता प्रमाणामध्ये (सीआरआर) बॅंकेने कोणताही बदल केला नसून, तो चार टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सकाळी द्वैमासिक पतधोरण आढाव्यावेळी याबद्दल माहिती दिली.
घाऊक तसेच किरकोळ महागाईचे दर नियंत्रणात असल्यामुळे त्याचबरोबर केंद्र सरकारनेही वित्तीय तुटीला आवर घातल्याचे दिसून येत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. रिझर्व्ह बॅंकेने २०१५ वर्षात जानेवारी आणि मार्च दोनदा प्रत्येकी पाव टक्क्यांची रेपो दर कपात केली होती. आज पुन्हा एकदा रेपो दरात कपात केल्याने ही वर्षातील तिसरी कपात ठरली आहे.

Story img Loader