मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पहिले पतधोरण जारी करण्यास दोन दिवसांचा अवधी असताना डॉ. रघुराम राजन यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली. ‘रिझव्‍‌र्ह बँक वित्त खात्याबरोबर नेहमीच सल्लामसलत करत असते; आजची भेटदेखील त्याचाच एक भाग होता’, असे राजन यांनी प्रसारमाध्यमांना या भेटीनंतर सांगितले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करण्याबरोबरच त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांचीही भेट घेतली.
राजन यांनी पंतप्रधानांबरोबरही सद्य बिकट अर्थस्थितीबद्दल चर्चा केल्याचे सांगण्यात येते. ४ सप्टेंबर रोजी गव्हर्नरपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर रुपया भक्कम झाला असला तरी नुकतेच जारी झालेले सहा महिन्यांच्या उच्चांकी टप्प्यावरचे महागाईचे आकडे नव्या गव्हर्नरांसमोर पतधोरण तयार करताना आव्हान बनले आहे. नवी दिल्लीत यापूर्वी वित्त खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून भूमिका निभावणाऱ्या डॉ. राजन यांचे पहिले (रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही) पतधोरण शुक्रवारी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हचा रोखे खरेदीचा निर्णयही स्पष्ट होईल.