विविध उपाययोजनांद्वारे सोने आयातीला लागलेल्या बांधाचे स्वत:च कौतुक करत रिझव्र्ह बँकेने चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणाबाबत केंद्र सरकारपेक्षाही अधिक आशावादी कयास वर्तविला आहे. तथापि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या ६३ पर्यंत सुरू असलेल्या अवमूल्यनाला ठोस काहीही कारण नाही, असेही गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी स्पष्ट केले .
गव्हर्नर राजन यांनी अचानक बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत २०१३-१४ आर्थिक वर्षांअखेर चालू खात्यातील तूट ५६ अब्ज डॉलर राहील, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अंदाजित केलेला ७० अब्ज डॉलर व गेल्याच आठवडय़ात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ६० अब्ज डॉलर या सुधारीत भाकीतापेक्षा रिझव्र्ह बँकेने बांधलेले चालू खात्यावरील तुटीचा अदमास लक्षणीय कमी आहे.
रिझव्र्ह बँकेने अंदाजलेल्या चालू खात्यावरील तुटीचे हे प्रमाण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ३ टक्के तर गेल्या वर्षांतील तुटीच्या तुलनेत ३२ अब्ज डॉलरने कमी आहे, असेही राजन यांनी स्पष्ट केले. वाढत्या सोने आयातीवर रिझव्र्ह बँकेने वेळोवेळी लादलेल्या विविध र्निबधामुळेच ही तूट कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वाढत्या सोन्याच्या आयातीमुळे तूट गेल्या आर्थिक वर्षांत ८८ अब्ज डॉलपर्यंत पोहोचली होती.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या रुपयाच्या घसरणीला कोणतेही ठोस कारण नाही, असे गव्हर्नरांनी स्पष्ट केले. व्यवहारात दोन महिन्यांचा नवा तळ गाठणारे चलन दिवसअखेर मात्र ४१ पैशांनी भक्कम झाले. परकी चलनासाठी अन्य पर्याय अमलात आणणाऱ्या तेल कंपन्यांचा ओघ पुन्हा यासाठी रिझव्र्ह बँकेने उपलब्ध करून दिलेल्या एक खिडकी उपायाकडे वळत असल्याचे राजन यांनी निदर्शनास आणून दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा