किरकोळपाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकानेही डिसेंबरमध्ये उसंत घेतल्याने रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपातीची आयती संधी चालून आली आहे. किरकोळ महागाईने तीन महिन्यांतील निचांक नोंदविल्यानंतर बुधवारी जाहीर झालेल्या घाऊक महागाई दरानेही गेल्या पाच महिन्यांतील किमान पातळी गाठल्याने आगामी तिमाही पतधोरणात पाव ते अध्र्या टक्के व्याजदर कपातीची अटकळ आहे.
भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे तिमाही पतधोरण २८ जानेवारी रोजी जाहीर होत आहे. गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राजन यांनी सलग दोन वेळा प्रत्येकी पाव टक्क्याची व्याजदरवाढ केली आहे. यानुसार रेपो दर ७.२५ टक्क्यांवरून आता ७.७५ टक्के झाले आहेत. अनुकूल परिस्थिती असल्यास पतधोरणाव्यतिरिक्तही व्याजदर कपात केली जाऊ शकते, हे गव्हर्नरांचे विधानही सत्य ठरू शकते.
वाढती महागाई आणि कमी विकासदराच्या आव्हानासमोर गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांना गेल्या वेळच्या मध्य तिमाही पतधोरणात ‘जैसे थे’ व्याजदराचे धोरण अनुसरावे लागले होते. आगामी कालावधीत प्रत्यक्षातील कृषी उत्पादनामुळे चिंताजनक असलेल्या अन्नधान्याची महागाईदेखील कमी होईल, या आशेवर गव्हर्नरांनी यापूर्वीच व्याजदर कपातीबाबत समर्थताही दर्शविली आहे.
दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट झालेला डिसेंबरमधील किरकोळ महागाई निर्देशांक ९.८७ टक्क्यांपर्यंत खाली येताना तीन महिन्यांच्या किमान पातळीवर येऊन ठेपला होता. तर आता जाहीर झालेला याच कालावधीतील घाऊक किंमत निर्देशांकही ६.१६ टक्क्यांसह गेल्या पाच महिन्यांतील तळस्तरावर वाटचालकरता झाला आहे. हे दोन्ही दर आता अनुक्रमे १० व ५ टक्क्यांच्या आसपास स्थिरावले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून संथ प्रवास करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत ऐन सण-समारंभात, नोव्हेंबरमध्ये उणे २.१ टक्के औद्योगिक उत्पादन दराची नोंद करताना सहा महिन्यांतील सुमार कामगिरी बजाविली गेली. चालू आर्थिक वर्षांसाठी ५ टक्के विकास दराचे किमान उद्दिष्ट सरकारी पातळीवर राखले जात असतानाच उद्योग जगताकडून व्याजदर कपातीच्या सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.

Story img Loader