सामान्य कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी रिझर्व्ह बॅंकेने घेतला. रेपो दरात पाव टक्क्याने कपात करण्याचा निर्णय मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात घेण्यात आला. कपातीनंतर रेपो दर ७.५ टक्के राहणार आहे. बॅंकेने रेपो दरात बदल केला असला, तरी रोख राखीव प्रमाणात (सीआरआर) कोणताही बदल केलेला नाही. रोख राखीव प्रमाण दर ४ टक्के कायम ठेवण्यात आलाय.
विकासाला चालना देण्यासाठी आणि गुंतवणुकीचा वेग वाढविण्यासाठी रेपो दरात सलग दुसऱयांदा कपात करण्यात आल्याची माहिती बॅंकने दिली. मात्र, त्याचवेळी अन्नधान्याची महागाई आणि चालू खात्यातील तुटीबद्दल बॅंकेने पुढील काळात सावधपणे पावले टाकण्याचे सुतोवाचही यावेळी केले. रिझर्व्ह बॅंक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पुन्हा कपात करेल, अशी अपेक्षा बाजारात व्यक्त करण्यात येत होती. विकासाचे चक्र गेल्या काही महिन्यांपासून मंदावले आहे. चालू आर्थिक वर्षांचा विकासदर पाच टक्क्यापर्यंत खाली येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांकी आकडा आहे. या सगळ्या घडामोडींवर उपाय म्हणून रेपो दरात वाढ होण्याची अपेक्षा होती आणि मंगळवारी ती खरी ठरली.
बॅंकांना भासत असलेल्या आर्थिक चणचणीवर रिझर्व्ह बॅंक मंगळवारच्या पतधोरणात सकारात्मक पावले उचलेल, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले होते. रोख राखीव प्रमाणातही बॅंक कपात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, रोख राखीव प्रमाणात सध्या तरी कोणतीही कपात करण्याचे रिझर्व्ह बॅंकेने टाळले आहे.