चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर: वाढत्या महागाईची भीती अन् स्वस्त कर्जाची भेट
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी चौथ्या द्वैमासिक पतधोरणात मंगळवारी रेपोदरात अर्थात व्याजदरात घसघशीत अर्धा टक्का कपात केली. अर्थकारणाला चालना देण्यासाठी स्वस्त पतपुरवठा व्हावा, याकरिता या व्याजदर कपातीसाठी सरकार आग्रही होते. अर्थात ही व्याजदरकपात शुद्ध आर्थिक निकषांवरच केल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.
या व्याजदर कपातीद्वारे तमाम अर्थव्यवस्थेवरील मरगळ येत्या दसरा, दिवाळीत झटकून देण्याचा अनाहूत सल्ला रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे. महागाई ही वाढती राहणारच; पण त्यामुळे सण साजरा करण्याचे टाळू नका, असे जणू या धोरणातून रिझव्‍‌र्ह बँकेने सुचविले आहे.
किमान पाव टक्क्याची अपेक्षा असताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केलेल्या घसघशीत अर्धा टक्का रेपो दरामुळे कर्जदारांचे गृह, वाहन तर उद्योगांचे मोठे कर्जही स्वस्त होणार आहे. सणांच्या पाश्र्वभूमीवर विद्युत उपकरणे, ग्राहोकपयोगी वस्तू आदी खरेदी सुलभ करणाऱ्या या निर्णयाचे शेअर बाजारातही निर्देशांक वाढीने स्वागत झाले.
रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत निधी उपलब्ध होत असलेल्या रकमेवरील कर्ज म्हणून मोजमाप होणाऱ्या रेपो प्रमाणात गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी कपात करत ते ६.७५ या साडेचार वर्षांच्या तळात आणून ठेवण्यात आले आहेत. आता प्रत्यक्षात व्यापारी बँकांनी त्यांचे कर्ज दर कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. मात्र याचबरोबर रिझव्‍‌र्ह बँकेने महागाईबाबत चिंता व्यक्त केली आहे. ऑक्टोबरपासून महागाई वाढण्याची चिन्हे असून हा क्रम मार्च २०१६ पर्यंत कायम राहण्याची भीती राजन यांनी व्यक्त केली. सध्या ३.५ टक्क्यांच्या आसपास असणारा किरकोळ महागाई दर जानेवारी २०१६ पर्यंत ५.८ जाईल व पुढील आर्थिक वर्षांतच तो नरम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

देशाचा विकास आणि शाश्वतता हे एकत्रित असले पाहिजे आणि त्यासाठी यंदा दर कपात करण्यात आली आहे. सणांच्या पाश्र्वभूमीवर ती मोठी जाणवेल. मी मात्र माझे काम केले.
– डॉ. रघुराम राजन, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर
***
आता व्यापारी बँकांही त्यांचे कर्ज व्याजदर कमी करतील. सरकारच्या आर्थिक सुधारणांना रिझव्‍‌र्ह बँकेने एक प्रकारे पाठिंबाच दर्शविला आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्रीदेशाचा विकास आणि शाश्वतता हे एकत्रित असले पाहिजे आणि त्यासाठी यंदा दर कपात करण्यात आली आहे. सणांच्या पाश्र्वभूमीवर ती मोठी जाणवेल. मी मात्र माझे काम केले.
– डॉ. रघुराम राजन, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर
***
आता व्यापारी बँकांही त्यांचे कर्ज व्याजदर कमी करतील. सरकारच्या आर्थिक सुधारणांना रिझव्‍‌र्ह बँकेने एक प्रकारे पाठिंबाच दर्शविला आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री