रिझव्र्ह बँकेच्या नव्या वर्षांतील आश्चर्यकारक भेटीचा त्याच उत्साहाने स्वीकार करत मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यहारात पाच वर्षांतील सर्वोच्च झेप नोंदविली. यामुळे सेन्सेक्स थेट २८ हजारांवर पोहोचला, तर सत्रातील द्विशतकी उडीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५०० नजीक गेला. मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक, सेन्सेक्समधील २८ समभाग यांच्या हिरव्या यादीतील स्थानाने गुंतवणूकदारांची मालमत्ताही १०० लाख कोटींवर गेली. जवळपास २०० कंपन्यांच्या समभागाने वर्षांचा उच्चांकी दर टप्पा गाठला.
एकाच व्यवहारातील मुंबई निर्देशांकाची ७२८.७३ अंश झेप सेन्सेक्सला २८,०७५.५५ पर्यंत घेऊन गेली, तर २१६.६० अंश वाढीने निफ्टी ८,४९४.१५ वर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांचे अनुक्रमे २८,१९४.६१ व ८,५२७.१० हे सत्रातील सर्वोच्च टप्पे राहिले. सेन्सेक्सची एकाच व्यवहारातील गेल्या पाच वर्षांतील ही सर्वोत्तम झेप नोंदली गेली. यापूर्वी १८ मे २००९ रोजी मुंबई निर्देशांक सत्रात तब्बल २,११०.७९ अंशांनी उंचावला होता.
भांडवली बाजारातील व्यवहार सुरू होण्यापूर्वी रिझव्र्ह बँकेची आश्चर्यकारक व्याजदर कपात झाल्याने प्रमुख निर्देशांकाची सुरुवातच मोठय़ा उसळीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स या वेळी तब्बल ६०० अंशांनी खुला होत तो थेट २८ नजीक पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत याचवेळी जवळपास दोनशे अंशांची उडी नोंदली गेल्याने देशातील सर्वात मोठय़ा बाजाराच्या आघाडीच्या निर्देशांकाने सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारातच ८,४०० चा टप्पा पार केला.
सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ८ टक्क्य़ांपर्यंतची वाढ नोंदली गेली, तर तेजीच्या वातावरणात सेन्सेक्समधील केवळ दोन समभागांचे मूल्य रोडावले. स्थावर मालमत्ता, बँक, भांडवली वस्तू, वाहन या व्याजदराशी निगडित समभागांचे मूल्य कमालीचे वाढले.
१९२ कंपन्यांची वार्षिक मूल्य झेप
गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील १९२ कंपन्यांचे समभाग गुरुवारी त्यांच्या गेल्या वर्षभरातील सर्वोच्च मूल्यांवर पोहोचले. यामध्ये सेन्सेक्समधील अॅक्सिस बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी यांचा क्रम राहिला, तर प्रमुख निर्देशांकाबाहेरील डाबर, फेडरल बँक, जेट एअरवेज, जेएसडब्ल्यू एनर्जी, कोटक महिंद्र, टीव्हीएस मोटर्स, बाटा, बजाज कॉर्प यांनीही गेल्या ५२ आठवडय़ांतील सर्वाधिक समभाग भाव मिळविला.
मत्ता १०० लाख कोटींपल्याड!
प्रतिकूल जागतिक घडामोडींपायी गेल्या काही दिवसांत आलेली मरगळ पूर्ण झटकून देणारी ऊर्जा गुरुवारी भांडवली बाजाराला रिझव्र्ह बँकेच्या दरकपातीने दिली. बाजाराच्या निर्देशांकांच्या हनुमान उडीबरोबरीनेच, या उत्साही उधाणाला असलेले अन्य महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची एकूण बाजारभांडवल या तेजीने १०० लाख कोटी रुपयांपल्याड गेले.
इतर ठळक वैशिष्टय़े..
*निर्देशांकांनी एका दिवसांत घेतलेली गत पाच वर्षांतील सर्वात मोठी झेप
*सेन्सेक्सने २८ हजारांचा महत्त्वपूर्ण स्तर पुन्हा कमावला
*निफ्टीही ८५००च्या उंबरठय़ावर
*२०० समभाग सार्वकालिक उच्चांकावर
*मुंबई शेअर बाजाराची एकूण मत्ता १०० लाख कोटींपल्याड
बाजारात हर्षोल्हास
रिझव्र्ह बँकेच्या नव्या वर्षांतील आश्चर्यकारक भेटीचा त्याच उत्साहाने स्वीकार करत मुंबई शेअर बाजाराने गुरुवारी एकाच व्यहारात पाच वर्षांतील सर्वोच्च झेप नोंदविली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-01-2015 at 02:53 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi effect sensex jumps 728 73 pts to close at 28075 nifty surges 216 60 pts to