रिझव्र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डॉ. रघुराम राजन यांच्या मुदतवाढीच्या मुद्दय़ावर उलटसुलट टिकाटिप्पणी सुरू असतानाच, चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले खुद्द राजन यांनी मात्र सप्टेंबरनंतर आपल्याला या पदावर राहण्यात रस नसल्याची इच्छा व्यक्त केली आहे. केंद्र सरकारकडून मात्र हे वृत्त म्हणजे अटकळबाजी असल्याचे सांगत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत त्याचे खंडन केले आहे.
एका बंगाली नियतकालिकाने रिझव्र्ह बँकेतील सूत्राच्या हवाल्याने राजन यांचे दुसऱ्यांदा गव्हर्नरपद सांभाळण्याबद्दल नाखुषीचा कल स्पष्ट करण्यात आला आहे. रिझव्र्ह बँकेतील तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर ते अमेरिकेत शिकागो विद्यापीठातील अध्यापन कार्यात पुन्हा रूजू होण्यास इच्छुक असल्याचा हवालाही वृत्तात देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मात्र राजन यांना मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचे या वृत्तात दावा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ तसेच विदेशात प्राध्यापकी केलेल्या राजन यांना रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून पुन्हा दोन वर्षांसाठी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र सत्ताधारी भाजपचे खासदार व ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यन स्वामी यांनी राजन हे शेतकरी, लघुउद्योगविरोधी तसेच अमेरिकाधार्जिणी धोरणे राबवित असल्याचे पंतप्रधानांना पत्र लिहित त्यांना तात्काळ पदमुक्त करून, अमेरिकेत पुन्हा रवानगी केली जावी असा आग्रह धरला आहे. गोदरेज समूहाचे अदी गोदरेजसह अनेक उद्योजकांनी राजन यांना मुदतवाढ देण्याबाबत समर्थन केले आहे.
राजन यांचा कार्यकाळ वाढविला न गेल्यास, १९९२ नंतर पाच वर्षांचा कार्यकाळ न मिळणारे ते पहिले गव्हर्नर ठरतील. १९९२ पासून रिझव्र्ह बँकेवरील चारही गव्हर्नरांचा कार्यकाळ हा प्रत्येकी पाच वर्षांचा राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा