नवे बँक परवाने जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता देण्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच याचे पहिले लाभार्थी म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील आयडीएफसी व बंधन या सूक्ष्म वित्त क्षेत्रातील दोन कंपन्यांची नावे बुधवारी उशिरा जाहीर केली. तिसऱ्या फळीतील नव्या बँका स्थापन करण्यास मध्यवर्ती बँकेकडे अर्ज करणाऱ्या २५ अर्जामध्ये या दोन वित्तसंस्था पहिल्या मानकरी ठरल्या आहेत.
नव्या बँक परवान्यांसाठी अर्जदारांच्या छाननीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारसीनंतर सरकारी मालकीच्या आयडीएफसी (इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट फायनान्स कंपनी) व कोलकतास्थित बंधन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस लिमिटेडला परवाना देण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केला आहे. बँकिंग व्यवसायासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची प्राथमिक परवानगी मिळालेल्या या दोन्ही वित्तसंस्थांना आता येत्या दीड वर्षांत तयारी करावी लागेल.
रिझव्‍‌र्ह बँकेकडे आलेल्या २५ अर्जदारांपैकी सरकारी टपाल विभागाच्या अर्जाचा स्वतंत्र विचार करावा, अशी शिफारस याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. बिमल जालान समितीने केली आहे. तेव्हा आता रिझव्‍‌र्ह बँक टपाल विभागाला बँक परवाना देण्याबाबत सरकारशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. सध्याच्या निवडणूक आचारसंहितेमुळे त्याला विलंब लागण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील आणखी तीन अर्जदार प्रतीक्षेत आहेत.
बँकिंग परवाने प्रक्रियेचा प्रवास..
*फेब्रुवारी २०१० : तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडून नव्या बँक परवान्याचे सूतोवाच.
*फेब्रुवारी २०१३ : भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेकडून नव्या बँक परवान्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी.
*जुलै २०१३ : रिझव्‍‌र्ह बँकेकडे नव्या बँक परवान्यांसाठी २७ जाणांचे अर्ज प्राप्त; पैकी व्हिडीओकॉन समूहातील व्हॅल्यू इंडस्ट्रिज व टाटा सन्सची नंतर माघार.
*ऑक्टोबर २०१३ : परवाने छाननीसाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती.
*फेब्रुवारी २०१४ : रिझव्‍‌र्ह बँकेकडून सर्व २५ अर्ज नजरेखालून घातल्यानंतर समितीद्वारे लाभार्थी नावांची शिफारस केलेला अहवाल सादर.
*मार्च २०१४ : परवाने जारी करण्यास अडचण येऊ नये म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेकडून निवडणूक आयोगाला ना-हरकतीचे आर्जव पत्र.
*एप्रिल २०१४ : बँक व्यवसायासाठी पात्र लाभार्थीची नावे जारी करण्यास आयोगाद्वारे परवानगी व पहिल्यांदा पात्र दोन नावे जाहीर.

*आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारतीय बँकिंग व्यवसाय हा ८४ लाख कोटी रुपयांचा आहे. देशात आजच्या घडीला २७ सार्वजनिक बँका असून खासगी क्षेत्रातील बँकांची संख्या २२ आहे. तब्बल दशकभरानंतर बँक परवाने जारी करण्याच्या प्रक्रियेपूर्वी (२००३-०४) कोटक महिंद्र आणि येस बँक हे शेवटचे लाभार्थी ठरले होते. ९०च्या दशकातील उदारीकरणानंतर तब्बल १० कंपन्यांना बँक परवाने दिले गेले होते.
*मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या व बँक परवान्यासाठी पहिला लाभार्थी ठरलेल्या आयडीएफसीचा समभाग बुधवारी ३.९८ टक्क्यांनी उंचावत १२८ रुपयांवर पोहोचला.

एक शहरी, तर दुसरी ग्रामीण; एकीपुढचे आव्हान हे दुसरीचे सामथ्र्य..!
आयडीएफसीसामथ्र्य :
*१९९७ सालच्या प्रारंभापासून पायाभूत क्षेत्रासाठी अर्थसाह्य़ातील एक दमदार नाव
*म्युच्युअल फंड, गुंतवणूक बँकिंग ते ब्रोकिंग अशा विविधांगात विस्तारासह वित्तीय सेवा परिघात उत्तम संचार  
*विविध पायाभूत प्रकल्पांसाठी कर्ज व्यवसाय तब्बल १३,६८२ कोटींपल्याड!
*गेल्या काही वर्षांत करमुक्त परताव्याच्या रोख्यांची विक्री करून कंपनीने जनसामान्यांमध्ये जाऊन निधी उभारणीच्या कसोटीवर आपले सुयश स्पष्ट केले आहे.
आव्हाने :
*दीर्घ मुदतीच्या पायाभूत प्रकल्पांसाठी बडय़ा रकमेच्या कर्ज व्यवहारापुरते आजवर मर्यादित राहिलेल्या व्यवसायाला, ‘रिटेल’ वळण देणे महत्प्रयासाचे ठरेल.
*पूर्णपणे शहरी तोंडावळा राहिलेल्या वित्तसंस्थेला मूळापासून ग्रामीण भागाकडे पाय वळविणे जिकिरीचे ठरेल.
*विशेषत: प्रत्येक नव्या चार शाखांमधील एक शाखा ग्रामीण भागात उघडणे बंधनकारक करणारा दंडक कसोटीचा ठरेल.

बंधन फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस सामर्थ्य
*देशातील १८ राज्यांच्या ग्रामीण क्षेत्रात मुख्यत्वे पूर्व भारतात छोटय़ा कर्जदारांना वित्त साहाय्याचा दांडगा अनुभव
*सूक्ष्म वित्त क्षेत्रात असूनही तब्बल ४,४२१ कोटी रुपयांचे कर्ज वितरण
*प्राधान्य क्षेत्रासाठी कर्ज-वितरणाचे आणि ग्रामीण क्षेत्रात विस्ताराचे पालन जेथे प्रस्थापित बँकांनाही आव्हानात्मक ठरत असताना, बंधनसाठी ते सहजसाध्य ठरेल  
*बँकिंग प्रवेशासाठी सल्लागार कंपनी ‘डेलॉइट टच’च्या सहाय्याने आराखडय़ातून सुसज्जता  
आव्हाने:
*वाणिज्य बँक म्हणून उभे राहताना आवश्यक भांडवली बळ उभारणे अवघड ठरेल
*सध्याच्या मनुष्यबळाकडे ग्रामीण भागाची उत्तम समज असली तरी बँकिंग व्यवसायासाठी विविधांगी कौशल्य असलेले कर्मचारी-अधिकारीगण आवश्यक ठरेल.
*सध्या नगण्य असलेले तंत्रज्ञानात्मक अवलंबित्व पाहता, या आघाडीवरही मोठी गुंतवणूक गरजेची ठरेल.

Story img Loader