शेअर बाजारात निर्देशांकांच्या उडालेल्या ऐतिहासिक घसरगुंडीसह, रुपयाच्या सुरू असलेली पडझडीने धास्तावलेल्या मंडळींना धीर देताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताचा व्यापक आर्थिक पाया हा अन्य अनेक देशांच्या तुलनेत खूपच सुदृढ असल्याचे सोमवारी येथे सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेत अनेकांगाने सुस्थितीत असल्याचे मी आपणास पटवून देऊ इच्छितो, असे उद्गार राजन यांनी भारतीय बँक महासंघ (आयबीए) आणि फिक्की यांच्याद्वारे संयुक्तपणे आयोजित राष्ट्रीय बँकिंग परिषदेच्या उद्घाटनानिमित्त बोलताना काढले. देशाची गेल्या काही काळात मजबूत बनलेली ३८० अब्ज अमेरिकी डॉलरच्या परकीय चलन गंगाजळीचा रुपयातील घसरण रोखण्यासाठी वापर करण्याची गरज भासल्यास, ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. सोमवारी समभागांच्या बेभान विक्रीतून शेअर बाजारात घेतलेली गटांगळी व परिणामी रुपयाने प्रति डॉलर ६६.५० पल्याड घेतलेली लोळण पाहता राजन यांनी केलेले वक्तव्य खूपच महत्त्वाचे ठरते. तथापि रुपया हा येन आणि युरो अन्य प्रमुख विदेशी चलनांच्या तुलनेत मजबूत बनला असून, रुपयाच्या मूल्यातील वध-घटीचा सामना करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडे मुबलक साधने असल्याचे राजन यांनी स्पष्ट केले.
चलन बाजारात सध्या जागतिक स्तरावर उडालेला थरकाप हा दीर्घ काळापासून अटळ व अपरिहार्यच होता, चीनमधील ताजा घटनाक्रम ही त्याची शेवटची पायरी आहे, असेही राजन यांनी सूचक उद्गार काढले.
अजीजीने दर कपात होणार नाही
महागाईचा दर शाश्वत रूपात खालचा स्तरावर राहिल्याचे आढळले तर व्याजाच्या दरात कपात केली जाईल, कुणी जाहीरपणे अजीजी केली म्हणून त्याला उपकृत करण्यासाठी कपात होणार नाही, असे राजन यांनी नि:संदिग्धपणे सांगितले. उद्योगजगतातून आणि विशेषत: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही महागाई दरातील उतार पाहता, व्याज दरात कपातीसाठी सुरु केलेल्या घोषाच्या पाश्र्वभूमीवर राजन यांनी तो खोडून काढणारे हे उद्गार काढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमुख जिनसांच्या घसरलेल्या किमती आणि देशांतर्गत किमतीही खालच्या स्तरावर राहतील यासाठी सरकारकडून अन्नधान्याच्या वितरणाचे काटेकोर व्यवस्थापन या बाबी व्याजदर कपातीसाठी मदतकारक ठरतील. राजन यांच्या मते कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण ही पुढचे वर्ष – दोन वष्रे कायम राहील.

Story img Loader