भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यादरांमध्ये ५० आधारिबदूंनी (०.५० टक्क्यांनी) वाढ केली आहे. ही सलग चौथी व्याजदर वाढ आहे. या वाढलेल्या व्याजदरामुळे सर्वसामान्यांना फटका बसणार असून व्याजाच्या हफ्त्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रिझव्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदर वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. ही वाढ तात्काळ लागू होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सध्याचा रेपो दर हा ५.९ असून हा मागील तीन वर्षांमधील उच्चांक आहे.
नक्की वाचा >> ‘रिझर्व्ह बँक’ऐवजी ‘रिव्हर्स बँक’ने छापलेल्या २ हजारांच्या २५ कोटी मूल्याच्या नोटा जप्त; गुजरात पोलिसांची अहमदाबाद-मुंबई मार्गावर कारवाई
“रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढ करुन तो तात्काळ प्रभावाने तो ५.९ टक्के दराने लागू होणार आहे,” अशी घोषणा दास यांनी केली. “या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपीमधील वाढ ही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. जीडीपीची वाढ १३.५ टक्के आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेंच्या तुलनेत सर्वाधिक वाढ आहे,” असंही दास यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> विश्लेषण : व्याजदरात चढउतार का होतो? जाणून घ्या
रिझव्र्ह बँकेकडून अमेरिकी फेडरल रिझव्र्हसह, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी अनुसरलेल्या धोरणाप्रमाणे चिवट चलनवाढीला आळा घालण्यासाठी शुक्रवारी सलग चौथ्यांदा व्याजदर वाढविले जाणे जवळपास निश्चित मानलं जात होतं. आजवर रिझर्व्ह बँकेने रेपो दर १४० आधारबिंदूंनी (१.४० टक्क्यांनी) वाढविला आहे. व्याजदरातील आक्रमक वाढ होणार हे बाजाराने गृहीतच धरल्याचं सांगितलं जात आहे.
विशेषत: भारत आणि अमेरिका यांच्यातील रोख्यांच्या परताव्यातील तफावत ३४८ आधारिबदू (३.४८ टक्के) अशा बहुवार्षिक नीचांकी पातळीवर घसरली आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारापासून दुरावत चालले आहेत. हे पाहता त्याला प्रतिबंध म्हणून शुक्रवारी रेपो दर ०.५० टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.