सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बॅंकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुधीर कुमार जैन यांना लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रिझर्व्ह बॅंकेने आता या बॅंकेचे लेखा परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनीच मंगळवारी ही माहिती दिली.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या नियंत्रणासंदर्भात काही प्रश्न असल्याचेही रघुराम राजन यांनी मान्य केले. त्याचबरोबर या बॅंकांकडून देण्यात येणाऱया कर्जाच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकताही आणली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सिंडिकेट बॅंकेतील प्रकारावरून संपूर्ण बॅंकिंग पद्धतीवर आरोप करण्याआधी प्रत्येकाने विचार करायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. तिमाही पतधोरण आढाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना रघुराम राजन यांनी सिंडिकेट बॅंकेवरील कारवाई बद्दल माहिती दिली.
दोन कॉर्पोरेट कंपन्यांना कर्जे मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडून लाच घेतल्याच्या आरोपावरून जैन यांना अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी या बॅंकेच्या बुडीत कर्जांमध्ये गेल्या पाच वर्षांत वेगाने वाढ झाल्याची माहितीही ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने माहितीच्या अधिकारांतून मिळवली आहे. २००८-०९ या आर्थिक वर्षात बुडीत कर्जांची संख्या ४०,७०६ इतकी होती. ती २०१२-१३ मध्ये वाढून ०१,५३, ९५९ पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा