वाढती महागाई व बँकांकडून कर्जावरील व्याजदरात कपातीबाबत हयगयीबद्दल सरकार आणि वाणिज्य बँका या दोन्ही यंत्रणांना दोष देत  रिझव्‍‌र्ह बँकेने आपले प्रमुख धोरण दरात कोणतेही बदल न करणारे पतधोरण मंगळवारी जाहीर केले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हची सप्टेंबरमधील बैठकीत ठरणारी चाल तसेच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा कलच आगामी रेपो दर कपात ठरवेल, असे म्हणत गव्हर्नर रघुराम राजन यांनी तूर्त व्याजदर कपातीची कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या द्वैमासिक आढाव्यात रिझव्‍‌र्ह बँकेने स्थिर व्याजदराचे पतधोरण मंगळवारी मांडले. असे करताना गव्हर्नरांनी रेपो, रिव्हर्स रेपो, सीआरआर तसेच एसएलआर या प्रमुख दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. महागाईचा अंदाज काहीसा दिलासादायक वर्तवित देशाच्या विकास दराबाबतची आपली आशा मध्यवर्ती बँकेने अधिक उंचावली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी, चौथे द्वैमासिक पतधोरण येत्या २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधीच गणेशोत्सवाची सांगता होईल. याचवेळी अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हमार्फतही दरनिश्चिती संदर्भात बैठक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यावेळी येते दरकपात झाली तरी ती गणपती उत्सवानंतरच होईल. मध्यंतरात दरकपात शक्य असल्याचे डॉ. राजन यांनी म्हटले असले तरी मान्सून व महागाई यावर ते अधिक निर्भर असेल. यानंतर महिन्याभराने दसरा-दिवाळी आहे.
व्याज दरकपातीसाठी विराम घेणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या दृष्टीने आगामी कालावधीतील अर्थविकासाची आकडेवारी पाहणे अधिक उत्साहजनक ठरणार आहे. जुलैमधील किरकोळ तसेच घाऊक महागाईचे चित्र चालू महिन्यात स्पष्ट होणार आहे. तसेच जूनमधील औद्योगिक उत्पादन दरही ऑगस्टमध्येच जारी होईल. त्याचबरोबर तमाम अर्थव्यवस्थेला प्रतीक्षा असेल तरी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराच्या आकडेवारीची.
मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी ७.६ टक्के विकास दर अंदाजित केला आहे. तर जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान महागाईचे रिझव्‍‌र्ह बँकेचे उद्दिष्ट ०.२० टक्क्य़ांनी खाली आणले गेले आहे.

बँकांना पुन्हा दट्टय़ा
चालू वर्षांत आतापर्यंत तीन वेळा प्रत्येकी पाव टक्क्य़ाची दरकपात करूनही बँकांनी मात्र त्या तुलनेत केवळ ०.३० टक्क्य़ांपर्यंतच व्याजदर कमी केले आहेत, असा रोष गव्हर्नर राजन यांनी मंगळवारी पतधोरण मांडताना व्यक्त केला. रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेला निर्णय जोपर्यंत पूर्णत: बँक ग्राहकांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत आणखी दरकपात नाही, असे समर्थनही राजन यांनी आपल्या ‘जैसे थे’ निर्णयाचे केले. त्याचबरोबर महागाई हवी त्या प्रमाणात कमी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सरकारकडून उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करतानाच कमी मान्सूनबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

व्याजदर निश्चितीचा निर्णायक मताधिकाराबाबत राजन आशावादी
* रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण निश्चितीसाठी नेमण्यात आलेल्या सरकारच्या समितीला आपला विरोध नसून ही समिती व्याजदरावर देखरेख करण्यासाठी असल्याचे गव्हर्नर डॉ. राजन म्हणाले. या समितीची जबाबदारी आता सरकारची राहणार असून गव्हर्नरांना असलेल्या मताधिकारात बदल होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी पतधोरण जाहीर केल्यानंतर पत्रकारांसमोर व्यक्त केली. समितीत गव्हर्नरांना अभिप्रेत असलेल्या अधिकारांबाबत केंद्रीय अर्थ सचिव लक्ष घालत असून लवकरच ते स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार सर्वोच्च संस्था असल्याचे मान्य करत रिझव्‍‌र्ह बँकेच्या कायद्यातही नमूद आहे, असे डॉ. राजन यांनी स्पष्ट केले.

महिनाअखेपर्यंत आणखी बँक परवान्यांबाबत निर्णय
* पेमेन्ट तसेच स्मॉल बँक म्हणून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांची अंतिम नावे ऑगस्टअखेर जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा गव्हर्नर डॉ. राजन यांनी पतधोरण जारी करताना केली. या श्रेणीतील हा पहिला संच असेल. छोटय़ा बँका सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतच्या नावांची शिफारस नचिकेत मोर व उषा थोरात यांच्या समितीने केली आहे. पेमेन्ट उत्सुकतेसाठी मध्यवर्ती बँकेकडे ४१ जणांची नावे आली. यामध्ये रिलायन्स, टेक महिंद्र, आदित्य बिर्ला नुवो, एअरटेल एम कॉमर्स तर स्मॉल बँकेसाठी अर्ज करणाऱ्या ७२ जणांमध्ये दिवाण हाऊसिंग फायनान्स, आयआयएफएल होल्डिंग्स, उज्जीवन फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस, यूएई एक्स्चेन्ज आदींचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात पतधोरण :
*  रेपो, रिव्हर्स रेपो, सीआरआर यासह एसएलआर जैसे थे
* अर्थव्यवस्थेतील सुधारवेगाबाबत आशावाद
* यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता
* तुटीच्या पावसापायी महागाई वाढण्याची भीती
* शहरी भाग वगळता ग्राहकांच्या मागणीचा अभाव
* अमेरिका, युरोप सावरले तरी जपान, चीनमुळे  निर्यातीवर परिणाम

मान्सून यंदा चांगला राहिला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाबरोबरच, देशाच्या खाद्यान्नाच्या किमती आटोक्यात राहिल्यास आगामी पतधोरणापूर्वीही दर कपात शक्य आहे. मात्र बँकांनाही ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून या क्षेत्रातील मागणी वाढविण्याच्या हेतूने प्रयत्न करावे.
रघुराम राजन, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर

Story img Loader