गेल्या चार सलग चार पतधोरणात दिसलेले दर स्थिरतेचे धोरण कायम ठेवत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी  मंगळवारी सादर झालेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर जैसे थे ठेवणाऱ्या धोरणाची री ओढली. तथापि कमी होत असलेल्या महागाईबाबत आशावाद व्यक्त करतानाच नव्या वर्षांत व्याजदर कपातीचे संकेत दिले. यामुळे तूर्त बँकांमार्फतही व्याजदर सवलत दिली जाण्याची शक्यता नसल्याने गृहकर्जदारांचा मासिक हप्त्याचा भार आहे त्याच स्तरावर कायम राहणार आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१४ नंतर पुन्हा एकदा दर स्थिर ठेवल्याने कर्जदारांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रेपो दर, रिव्हर्स रेपो, सीआरआर अशा कोणत्याही दरात बदल न करता, नजीकच्या भविष्यात मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने कमी महागाई आणि वाढीव विकास दराबाबत आशावाद व्यक्त केला. सध्या महागाई कमी होताना दिसत असली तरी त्यात सातत्य हवे; तेव्हा आताच व्याजदर कपात ही घाई होईल, असे स्पष्ट करत त्यांनी आगामी व्याजदर कपात ही नव्या वर्षांतच होईल, असे सूचित केले. सलग पाच वर्षे वरच्या स्तरावर राहिल्यानंतर गेले अवघे दोन महिनेच ती कमी झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या वर्षभरापासून कर्जावरील व्याजाचे दर आहे त्या टप्प्यावरच आहेत. यंदाच्या सण-समारंभातही व्यापारी बँकांकडूनही व्याजदर सवलती नाकारण्यात आल्या होत्या. बँकांकडे रोकड उपलब्धता असली तरी त्याचा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मात्र कुणीच उत्सुक नाही.
सध्या कमी होत असलेली महागाई आणखी काही महिने दिसेल; नोव्हेंबरमध्येही महागाई ओसरल्याचे चित्र राहील, असे नमूद करत गव्हर्नरांनी डिसेंबरपासून पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्ती केली. तेव्हा प्रत्यक्षातील व्याजदर कपात ही पुढील वर्षांतच होईल, अशी शक्यता आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे आगामी पतधोरण २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे; मात्र पतधोरणाव्यतिरिक्तही निर्णय घेता येतो, असे डॉ. राजन यांनी सांगितल्याने २८ फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच याबाबत भूमिका स्पष्ट होईल, असे चित्र आहे.
मध्यवर्ती बँकेने रेपो दर ८ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ७ टक्के आणि रोख राखीव प्रमाण (सीआरआर) ४ टक्के असे स्थिर ठेवले आहे. मार्च २०१५ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी महागाई दर ६ टक्के, तर विकास दर ५.५ टक्के अंदाजला आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई दर ५.५२ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत विकास दर ५.३ टक्केनोंदला गेला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वी जानेवारी २०१५ पर्यंत महागाई दर ८ टक्के, तर पुढील वर्षभरासाठी तो ६ टक्के अपेक्षित केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या पाच वर्षांच्या तळात विसावल्याचा सुखद परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ६२ नजीकचा प्रवास हा सध्या चिंतेचा विषय आहे.

धोरण स्थिरतेची कास..!

* रेपो, रिव्हर्स रेपो, सीआरआर स्थिर
* डिसेंबरपासून पुन्हा महागाई वाढण्याची भीती
* महागाईचे लक्ष्य ८ टक्क्य़ांऐवजी ६ टक्क्य़ांवर येणार
* विकासाचा वेग ५.५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचणार
* २०१५ च्या सुरुवातीपासून व्याजदर कपातीचे संकेत
* २ फेब्रुवारी २०१५ला रिझव्‍‌र्ह बँकेचे पुढील पतधोरण

अर्थ मंत्रालयाचा राजन यांना पाठिंबा
नवी दिल्ली: विकासाला हातभार आणि रोजगारात वाढीसाठी रिझव्‍‌र्ह बँक पुढील पतधोरणात नक्कीच व्याजदर कपात करेल, असा विश्वास व्यक्त करीत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गव्हर्नर राजन यांना पाठिंबा व्यक्त केला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारी सकाळी जाहीर झालेल्या पतधोरणानंतर अर्थ खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात, महागाईबाबत मध्यवर्ती बँकेच्या अंदाजामुळे खूपच प्रोत्साहन मिळत आहे. प्रस्तावित पतधोरण आराखडय़ाबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केलेल्या अपेक्षेनुरूपच आम्हीदेखील येत्या काही दिवसांमध्ये त्याबाबत चर्चा करू. महागाईबाबत नेमके धोरण आणि त्यामुळे गुंतवणूक तसेच विकासासाठीही कार्य करणे सुलभ होईल, असेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

बँकांची कर्जे थकविणाऱ्या  उद्योगजगताला फटकारे..
मुंबई: आर्थिक ताळेबंदाची भिकार अवस्था आणि विद्यमान कर्ज फेडता येईल इतकी सक्षमता उद्योगजगताकडे नाही हीच खरी समस्या आहे आणि व्याजाचे दर चढे असण्याचे कारणही तेच आहे, असे उद्योगक्षेत्राला उद्देशून रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी फटकारले. रेपो दरात कोणत्याही बदल न करणाऱ्या सलग पाचव्यांदा सादर केलेल्या पतधोरणापश्चात पत्रकारांशी ते बोलत होते. व्याजदराबाबत उद्योगक्षेत्रात प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे, असे सांगत राजन यांनी सद्य:स्थितीचे वर्णन केले. ‘‘उद्योगक्षेत्रावर आकारले जाणारे चढे व्याजदर हे त्यांच्या अवाजवी जोखमीवरील अधिमूल्यच आहे. काही उद्योगांची ही जोखीम जितकी अवाजवी आहे, तितके त्यांचे आर्थिक संतुलन बिघडत गेले आणि परिणामी कर्जफेडीची त्यांची उत्सुकता तरी कमी झाली अथवा सक्षमता तरी संपुष्टात आली आहे. यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला बिलकूल दोषी धरता येणार नाही. रिझव्‍‌र्ह बँकेचे नियंत्रण हे जोखीममुक्त व्याजदरावर आहे, तर कर्जदरावर आकारल्या जाणाऱ्या जोखीम अधिमूल्याला नियंत्रणात ठेवणे हे सर्वस्वी त्या त्या उद्योगाच्याच हाती आहे. जोखीममुक्त दरातील नरमाईसाठी चलनवाढीच्या स्थितीला आटोक्यात आणण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘रिझव्‍‌र्ह बँक ही विकासविरोधी आहे, ही उद्योगजगताने जोपासलेली गैरधारणा आहे, असे म्हणणारी मंडळी अत्यंत कोत्या दृष्टीची आहेत,’’ अशा शब्दांत राजन यांनी उद्योगक्षेत्राच्या दरकपातीचा आग्रह आणि त्याला न जुमानण्याबद्दल होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. ‘‘केवळ या तिमाहीतील विकासाची नव्हे तर पुढील अनेक वर्षांतील शाश्वत विकासाचा आम्हाला ध्यास आहे. देशाच्या सुदृढ आर्थिक विकासाला आम्हाला चिरंतन चौकट बहाल करायचीय. थोडी आणखी कळ सोसा, आपण लक्ष्याच्या अगदी समीप येऊन ठेपलो आहोत’’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

बँकांना व्याजदर कपातीचे आदेश देऊ शकत नाही
गव्हर्नर राजन यांची स्पष्टोक्ती
बँकिंग व्यवस्थेची नियंत्रक असलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेला व्यापारी बँकांना मात्र व्याजदर कपातीचे आदेश देता येत नाही, अशी भूमिका गव्हर्नरांनी विशद केली. व्याजदर कपातीची मागणी सर्वच स्तरांतून होत असली तरी त्याबाबत परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची क्षमता बँकांमध्ये आहे, असे नमूद केले. बँकांनी व्याजदर कमी केलेले नाहीत असे आपले स्पष्ट म्हणणे असले तरी तसे आदेश मी देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

पतधोरण ठरवताना रिझव्‍‌र्ह बँकेसमोर अर्थस्थितीचे सुसंगत चित्र असणे गरजेचे आहे. विशेषत: व्याजदर कपातीचा निर्णय घेताना, बचत दर, चलनवाढीचा दर, आर्थिक विकास दर, चलन विनिमय दर वित्तीय तुटीची स्थिती वगैरे अर्थव्यवस्थेतील  विविध विसंगती असता कामा नये. याच अनुषंगाने नवीन पतधोरण निश्चिती आराखडा स्वीकारण्याबाबत केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. जानेवारी २०१६ पर्यंत महागाई दराचे लक्ष्य सुधारून ४ टक्क्य़ांवर आणणेच उपयुक्त ठरणार आहे. विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका आमचीही आहे; मात्र केवळ तिमाहीपुरता विचार करून आम्हाला चालणार नाही.
’ डॉ. रघुराम राजन, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक

Story img Loader