गेल्या चार सलग चार पतधोरणात दिसलेले दर स्थिरतेचे धोरण कायम ठेवत रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सादर झालेल्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर जैसे थे ठेवणाऱ्या धोरणाची री ओढली. तथापि कमी होत असलेल्या महागाईबाबत आशावाद व्यक्त करतानाच नव्या वर्षांत व्याजदर कपातीचे संकेत दिले. यामुळे तूर्त बँकांमार्फतही व्याजदर सवलत दिली जाण्याची शक्यता नसल्याने गृहकर्जदारांचा मासिक हप्त्याचा भार आहे त्याच स्तरावर कायम राहणार आहे.
रिझव्र्ह बँकेने जानेवारी २०१४ नंतर पुन्हा एकदा दर स्थिर ठेवल्याने कर्जदारांना कोणताही दिलासा मिळणार नाही. रेपो दर, रिव्हर्स रेपो, सीआरआर अशा कोणत्याही दरात बदल न करता, नजीकच्या भविष्यात मात्र रिझव्र्ह बँकेने कमी महागाई आणि वाढीव विकास दराबाबत आशावाद व्यक्त केला. सध्या महागाई कमी होताना दिसत असली तरी त्यात सातत्य हवे; तेव्हा आताच व्याजदर कपात ही घाई होईल, असे स्पष्ट करत त्यांनी आगामी व्याजदर कपात ही नव्या वर्षांतच होईल, असे सूचित केले. सलग पाच वर्षे वरच्या स्तरावर राहिल्यानंतर गेले अवघे दोन महिनेच ती कमी झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या वर्षभरापासून कर्जावरील व्याजाचे दर आहे त्या टप्प्यावरच आहेत. यंदाच्या सण-समारंभातही व्यापारी बँकांकडूनही व्याजदर सवलती नाकारण्यात आल्या होत्या. बँकांकडे रोकड उपलब्धता असली तरी त्याचा लाभ कर्जदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मात्र कुणीच उत्सुक नाही.
सध्या कमी होत असलेली महागाई आणखी काही महिने दिसेल; नोव्हेंबरमध्येही महागाई ओसरल्याचे चित्र राहील, असे नमूद करत गव्हर्नरांनी डिसेंबरपासून पुन्हा महागाई वाढण्याची भीती व्यक्ती केली. तेव्हा प्रत्यक्षातील व्याजदर कपात ही पुढील वर्षांतच होईल, अशी शक्यता आहे. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे; मात्र पतधोरणाव्यतिरिक्तही निर्णय घेता येतो, असे डॉ. राजन यांनी सांगितल्याने २८ फेब्रुवारीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच याबाबत भूमिका स्पष्ट होईल, असे चित्र आहे.
मध्यवर्ती बँकेने रेपो दर ८ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ७ टक्के आणि रोख राखीव प्रमाण (सीआरआर) ४ टक्के असे स्थिर ठेवले आहे. मार्च २०१५ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांसाठी महागाई दर ६ टक्के, तर विकास दर ५.५ टक्के अंदाजला आहे. ऑक्टोबरमध्ये महागाई दर ५.५२ टक्के, तर दुसऱ्या तिमाहीत विकास दर ५.३ टक्केनोंदला गेला आहे.
रिझव्र्ह बँकेने यापूर्वी जानेवारी २०१५ पर्यंत महागाई दर ८ टक्के, तर पुढील वर्षभरासाठी तो ६ टक्के अपेक्षित केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या पाच वर्षांच्या तळात विसावल्याचा सुखद परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर असला तरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ६२ नजीकचा प्रवास हा सध्या चिंतेचा विषय आहे.
धोरण स्थिरतेची कास..!
* रेपो, रिव्हर्स रेपो, सीआरआर स्थिर
* डिसेंबरपासून पुन्हा महागाई वाढण्याची भीती
* महागाईचे लक्ष्य ८ टक्क्य़ांऐवजी ६ टक्क्य़ांवर येणार
* विकासाचा वेग ५.५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचणार
* २०१५ च्या सुरुवातीपासून व्याजदर कपातीचे संकेत
* २ फेब्रुवारी २०१५ला रिझव्र्ह बँकेचे पुढील पतधोरण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा