व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सोमवारी घेतला. रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणाचा तिमाही आढावा घेताना व्याजदर जैसे थे ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. त्याचवेळी रुपयाचे अवमूल्यन आणि अन्नधान्याच्या वाढत्या किंमती यामुळे पुन्हा एकदा चलनवाढीचा धोक्याची शक्यता रिझर्व्ह बॅंकेने वर्तविली.
रेपो दर ७.२५ टक्के, रोख राखीव निधी ४ टक्के ठेवण्याचाच निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला. गेल्या महिन्यात चलनवाढीच्या दरात घसरण झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करणार का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष होते.
चलनवाढीचा वेग काहीप्रमाणात कमी झाल्यामुळे नाणेनिधी धोरणाच्या माध्यमातून विकासादराशी संबंधित धोक्यांवर मार्ग शोधण्यास संधी मिळाल्याचे बॅंकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही मत बॅंकेने व्यक्त केले.