किरकोळ पाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित जुलैमधील महागाई दरानेही कमालीचा उतार नोंदविल्याने आता रिझव्र्ह बँकेमार्फत पतधोरणापूर्वीच व्याजदर कपात सामान्य कर्जदारांसह तमाम अर्थ उद्योगातून अपेक्षिली जात आहे. दर कपातीची अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती.
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित गेल्या महिन्यांतील महागाई दर उणे स्थितीत कायम राहिला आहे. सलग सातव्या महिन्यात त्यात नरमाई दिसून आली असून यंदा हा दर उणे (-) ४.०५ टक्के नोंदला गेला आहे. भाज्या तसेच इंधनाच्या कमी किमतीमुळे हा दर विक्रमी नीचांकावर येऊन ठेपला आहे.
दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेला ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित जुलैमधील किरकोळ महागाई दरदेखील कमी होत ३.७८ टक्क्य़ांवर आला होता. त्याचबरोबर जूनमधील औद्योगिक उत्पादन दरही ३.८ टक्क्य़ांपर्यंत उंचावला आहे. अर्थस्थितीतील सुधाराच्या या आकडेवारीच्या जोरावर रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा पुन्हा एकदा उंचावली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या २९ सप्टेंबर रोजी जाहीर होत आहे. मात्र गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या यापूर्वीच्या धक्कातंत्राने अवगत उद्योग वर्तुळाने तत्पूर्वीच दर कपातीबाबत आशा व्यक्त केली आहे.
रिझव्र्ह बँकेने जानेवारी २०१५ पासून तीन वेळा प्रत्येकी पाव टक्का दर कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षांतील चौथे द्वैमासिक पतधोरण जाहीर करतात गव्हर्नर डॉ. राजन यांनी दर स्थिर ठेवले होते. मात्र नजीकच्या कालावधीत चांगल्या मान्सूनच्या निर्भरतेवर पतधोरणाव्यतिरिक्तही दर कपात करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याचबरोबर चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचा विकास दर तसेच अन्य आर्थिक सुधारणा लक्षात घेऊन दर कपात केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले होते.
महागाईचा किरकोळ तसेच घाऊक किंमत निर्देशांकही आता कमी झाला आहे. त्यामुळे रिझव्र्ह बँकेला व्याजदर कपातीला यंदा पुरेसा वाव आहे. असे असताना ती पतधोरणापूर्वी गृहीत धरली तर त्यात गैर असे काहीच नाही, असे भारतीय औद्योगिक महासंघाचे (सीआयआय)चे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मान्सून पूर्वपदावर येत असताना आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन तसेच वायदा वस्तूंचे दरही कमी होत असल्याने येथेही महागाई कमी व्हायला हवी, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा