महागाई निर्देशांकांचा भयानक कळस पाहता येत्या आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर वाढ अटळ दिसते, या भीतीने शेअर बाजारात शुक्रवारी थरकाप उडवून दिला. बँकांसह व्याजदराबाबत संवेदनशील असलेल्या समभागांची सपाटून विक्री झाल्याने प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्सने तब्बल २१० अंशांनी लोळण घेतली.
सेन्सेक्सच्या निर्धारणात मोठा वाटा असलेल्या स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी या समभागांच्या आपटीचा निर्देशांकाच्या घसरणीत लक्षणीय योगदान राहिले. बँका घटक असलेल्या बीएसई बँकिंग निर्देशांकात आज २.२५ टक्क्य़ांची घसरण दिसली तर सेन्सेक्स व निफ्टी या मुख्य निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १ टक्का व १.१० टक्के घसरण दिसून आली.
गुरुवारी सायंकाळी बाजाराचे कामकाज आटोपल्यावर, किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे नोव्हेंबरचे आकडे जाहीर झाले. ११.२४ टक्के असे अपेक्षेपेक्षा खूपच वाईट आणि नऊ महिन्यांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर पाहता, रिझव्‍‌र्ह बँकेच्या १८ डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात आणखी पाव टक्क्य़ांची दर वाढ अटळ ठरेल, असे सर्वच विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या भाकिताचा गुंतवणूकदारांच्या भावनांवरील प्रतिकूल परिणाम आज दिसून आला.
घसरण-धास्ती कशासाठी?
ल्ल सलग चार दिवसांच्या घसरणीने सेन्सेक्सने ९ डिसेंबरच्या विक्रमी उच्चांक स्तरापासून ६११ अंक गमावले असून, तो दिवसअखेर २०,७१५.५८ वर स्थिरावला आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने निर्णायक कौल पाहता बाजाराने सप्ताहारंभी (९ डिसेंबरला) सेन्सेक्सने २१,३२६ असा सार्वकालिक उच्चांकी स्तर नोंदविला होता. परंतु पुढील आठवडय़ात रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणापाठोपाठ, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हच्या निर्णयाचीही बाजाराने धास्ती घेतली आहे. महागाईकडे अंगुलीनिर्देश करीत रिझव्‍‌र्ह बँक व्याजदरात वाढ करणे अपरिहार्यच दिसत आहे, तर अमेरिकेची अर्थस्थितीतील सुधार पाहता, फेडरल रिझव्‍‌र्हनेही द्रवतासुलभ रोखे खरेदी कार्यक्रम अकाली मागे घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. तसे झाल्यास बाजारात गुंतलेला विदेशी वित्तसंस्थांचा पैसा हा अमेरिकेच्या दिशेने वळेल. जी बाब स्थानिक बाजाराच्या सद्य पातळीवर मोठी पडझड करणारी ठरेल.

Story img Loader