दोन दिवसांवर आलेल्या दिवाळीत गृहकर्जदारांना थेट दिलासा देण्याचे रिझव्र्ह बँकेने टाळले असले तरी वाणिज्य बँकांना अतिरिक्त रोकड उपलब्ध करून देण्याच्या गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या पतधोरणामुळे येत्या काळात ठेवींवरील जादा व्याजाचा फराळ मात्र मिळणार आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीचे पतधोरण जाहीर करताना डॉ. राजन यांनी अपेक्षेप्रमाणे वाढत्या महागाईवर लक्ष केंद्रित करणारा रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढीचा निर्णय मंगळवारी घेतला. परिणामी वाणिज्य बँकांमार्फत मध्यवर्ती बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या अल्पकालीन कर्जाचा दर पाव टक्का वाढीने ७.७५ टक्के झाला आहे. या पर्यायाव्यतिरिक्त बँकांची आपत्कालीन उचल अर्थात एमएसएफ (मार्जिनल स्टॅडिंग फॅसिलिटी) दर याच प्रमाणात कमी करून ८.७५ टक्क्य़ांवर आला आहे. यातून बँकांकडून ताबडतोबीने कर्ज महाग होतील अशी शक्यता नसली, तरी मुदत ठेवींवर त्या अधिक व्याज मात्र देण्याला जागा निर्माण झाली आहे.
एमएसएफबाबत देण्यात आलेल्या सुटीमुळे व्यापारी बँकांकडील रोकड उपलब्धता वाढणार असून त्याचा लाभ या बँका ठेवीदारांना अधिक व्याज देण्यात परावर्तित करू शकतील. तथापि आधीच कर्ज वितरण मंदावलेल्या बँकाकडून रेपो दर वाढीपायी गृह, वाहन, गृहोपयोगी वस्तू आदींवरील कर्ज महाग करतील की नाही याबद्दल साशंकता आहे. केंद्र सरकारकडून बँकांना ताजे भांडवली सहाय्य मिळाल्यानंतर अनेक बँकांनी सणासुदीच्या तोंडावर वाहन तसेच अन्य कर्ज स्वस्त केले आहेत.
व्यापारी बँका रिझव्र्ह बँकेकडून ७ ते १४ दिवसांच्या कालावधीसाठी घेत असलेल्या रकमेवरील व्याजदरही पाव टक्क्याने वाढविण्यात आला आहे. सीआरआर, रिव्हर्स रेपो, एसएलआर, बँक आदी दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. बँकेचे आगामी मध्य तिमाही पतधोरण १८ डिसेंबर व तिसरे तिमाही पतधोरण २८ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे.
देशापुढील महागाई वाढीचे संकट कायम असल्याचे डॉ. राजन यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना विशद केले. चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित टप्प्यात महागाई दर सध्याच्या टप्प्यावरून खाली येईल, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी केवळ घाऊक महागाई निर्देशांकावर दिलेला भर चुकीचा असल्याचे नमूद करून किरकोळ महागाई दरदेखील दुहेरी आकडय़ानजीक प्रवास करता कामा नये, असे मत त्यांनी व्यक्त केली. याचबरोबर आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेत वाढीचा दरही ५ टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर कमजोर अर्थव्यस्थेचा दबाव तूर्त भारतावर कायम राहणार असला तरी कमी होत जाणारी व्यापार-वित्तीय तूट, वाढती निर्यात तसेच अपेक्षित कृषी उत्पादन व वस्तूंसाठी ग्रामीण भागातील वाढती मागणी या बाबी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवू शकतात, असा विश्वास डॉ. राजन यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा