चलन घसरणीनंतर रिझव्‍‌र्ह बँकेने नुकत्याच केलेल्या उपाययोजनांमुळे रोकड टंचाई भासत असली तरी कर्जासाठी मागणी नसल्याने नजीकच्या दिवसांत व्याजदर न वाढविण्याचा दिलासा व्यापारी बँकांनी दिला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘जैसे थे’ पतधोरणानंतर बँकांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या पंधरवडय़ात अन्य बँकांसाठीचे कर्ज महाग केले. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असून रुपया स्थिर होताच ती माघारी घेतली जाईल, या मध्यवर्ती बँकेच्या मंगळवारच्या आश्वासनाने बँकांनी कर्जदारांसाठी व्याजदर न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी याबाबत सांगितले की, रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजनांनंतर कोणत्याही व्यापारी बँकेने व्याजदर वाढविलेले नाहीत. रोकड संकुचित करण्याचे उपाय हे मर्यादित कालावधीसाठी आहेत. त्यातच कर्जमागणीही सध्या हवी तशी नाही. रिझव्‍‌र्ह बँकेकडून वाढविण्यात आलेले दर कमी झाल्यानंतर (दोन आठवडय़ांनंतर) कदाचित आमचेही (बँकांचे) व्याजदर कमी होतील.
खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजना बँकांच्या कार्यपद्धतीवर काय परिणाम करतात हे पाहिल्यानंतरच आगामी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ठ केले. त्यामुळे सध्या जोपर्यंत उपाययोजना कायम आहेत तोपर्यंत तरी व्याजदरांमध्ये फरक पडणार नाहीत. ही स्थिती दीड-दोन महिने राहू शकेल, असेही त्या म्हणाल्या. रिझव्‍‌र्ह बँकेच्या उपाययोजना देशाच्या विकासावर परिणाम करतील, अशी भीती व्यक्त करणाऱ्या नैनालाल किडवाई प्रमुख असलेल्या एचएसबीसीच्या मंगळवारीच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार या उपाययोजना तब्बल तीन महिने कायम राहतील. त्यामुळे व्यापारी बँकांसह रिझव्‍‌र्ह बँकेलाही या कालावधीत व्याजदर कमी करता येणार नाहीत, अशी शक्यता बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ लिबेकर एस्केसेन यांनी वर्तविली आहे.

Story img Loader