अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीकडे पाहता आजवर वापरात आलेली दरवाढीची मात्रा आता पुरे; यापुढे ‘थांबा आणि वाट पाहा’ हेच धोरण अनुसरून अर्थव्यवस्थेवरील तिचे परिणाम तपासले जातील, अशी स्पष्टोक्ती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी बुधवारी करून या पुढील काळात व्याजदरात वाढ केली जाणार नाही, असे संकेत दिले.
रिझव्‍‌र्ह बँकेने मंगळवारी दुसऱ्या तिमाहीच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात आणखी पाव टक्का वाढ केली. सप्टेंबरमध्ये करण्यात आलेल्या पाव टक्क्य़ांच्या वाढीनंतर रेपो दरातील ही सलग दुसरी वाढ आहे. बुधवारी मात्र गव्हर्नर राजन यांनी देशभरातील विश्लेषकांबरोबर झालेल्या ‘कॉन्फरन्स कॉल’ संवादात झाली तेवढी दरवाढ पुरेशी असल्याचे संकेत दिले. या दरवाढीचे अर्थव्यवस्थेवरील परिणाम जोखण्यासाठी काही काळ दिला जाईल, त्यानंतर पुढील निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.
रिझव्‍‌र्ह बँकेने जुलै २०१३ मध्ये अस्थिर बनलेल्या रुपयाला सावरण्यासाठी योजलेले द्रवता-रोधक उपाय आंशिक रूपात मागे घेतले असले तरी, महागाईच्या चढय़ा दरावर लक्ष केंद्रित करून रेपो दर वाढ करण्याचा निर्णय काल घेतला. तथापि, कच्चे तेल आयात करण्यासाठी डॉलरची गरज भागविणारी विशेष खिडकी ही आणखी काही काळ तरी कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.