बँकिंगचे व्यवहार घरबसल्या आणि कुठेही-केव्हाही शक्य करणारी सोय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या ऑनलाइन बँकिंग प्रणालीत घोटाळे- गैरव्यवहाराच्या वाढत्या तक्रारीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून ग्राहकांची ओळख पटविणारी दुहेरी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा ऑनलाइन बँकिंगची सुविधा उपलब्ध करणाऱ्या बँकांकडे आग्रह धरला आहे.
नेटबँकिंग पोर्टलवर ग्राहकांची ओळख पटविण्यासाठी पासवर्ड आणि त्या शिवाय आणखी एक टप्पा जोडला जावा, असे रिझव्‍‌र्ह बँकेने सुचविले आहे. ‘पब्लिक की इन्फास्ट्रक्चर (पीकेआय)’वर बेतलेली प्रणालीही यासाठी वापरात यावी असे मध्यवर्ती बँकेने सांगितले आहे. शिवाय बँकांनी आपल्या ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगशी संलग्न जोखीमांची पूर्ण जाणीव करून देणारे शिक्षण करून त्यांचे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक दक्षतांचीही माहिती द्यावी, असा रिझव्‍‌र्ह बँकेचा आग्रह आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या पुढाकाराने ‘पीकेआय’प्रणालीवर बेतलेले आरटीजीएस, एनईएफटी, सीबीएलओ, फॉरेक्स क्लीअरिंग, सरकारी रोख्यांचे क्लीअरिंग आदी व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्याची सोय शक्य झाली आहे. या उल्लेख केलेल्या उलाढालींसाठी ऑनलाइन बँकिंगचा वापर ग्राहक करू इच्छितात काय, असा पर्याय वाणिज्य बँकांना यापुढे प्रत्येक ग्राहकांना द्यावा लागेल.
ऑनलाइन बँकिंगबरोबरीने मोबाईल बँकिंग प्रणालीकडेही ग्राहकांचा ओढा वाढत आहे. आजच्या घडीला म्हणजे ३१ मार्च २०१४ अखेर देशभरात मोबाईल बँकिंग सेवांसाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून मंजूरी मिळविलेल्या सार्वजनिक, खासगी, सहकारी तसेच विदेशी बँकांची संख्या ८७ इतकी आहे. या ८७ बँकांचे ४५ कोटींच्या घरात खातेधारक असून, त्यापैकी सध्या केवळ २.२ कोटी खातेदारच मोबाइल बँकिंग सेवा वापरत आहेत. फेब्रुवारी २०१४ मध्ये मोबाईल बँकिंगद्वारे २६.३६ अब्ज रुपयांचे देवघेवीची उलाढाल या ग्राहकांकडून करण्यात आले.

Story img Loader