‘ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) ची पूर्तता न केल्याबद्दल रिझव्‍‌र्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांना एकूण ४.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावतानाच अन्य आठ बँकांना निर्वाणीचा कडक इशाराही दिला आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, यूको बँक, यूनियन बँक ऑफ इंडिया व विजया बँक यांना ‘केवायसी’ प्रक्रियेतील हयगयीबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने सावध केले आहे. या बँकांनी त्वरित पावले उचलण्यासही सांगण्यात आले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांना शिक्षा म्हणून प्रत्येकी १.५ कोटी रुपयांचा दंड बुधवारी ठोठावला आहे. बँक नियमन कायदा, १९४९ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.
केवायसीबाबत दिशादर्शनाचे पालन होत नसून त्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेने उपरोक्त बँकांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या बँकांनी केवायसीबाबत वेळोवेळी दक्ष राहून त्याची पूर्तता करावी, असे तिने सूचित केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांच्या मुंबईतील १२ शाखांमध्ये मुदत ठेवी सुरू करताना ग्राहकांची ओळख पटवणारी केवायसी प्रक्रिया पार न पाडल्याचे जुलै २०१४ मध्ये लक्षात आले. मुदत ठेवी सुरू करताना बँकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी बँकेव्यतिरिक्त मध्यस्थांचे सहकार्य घेतल्याचेही निदर्शनास आले. त्यावर रिझव्‍‌र्ह बँकेने पाठविलेल्या नोटिशीला बँकांना उत्तर देण्यास सांगण्यात आले. पैकी बँक ऑफ महाराष्ट्र, देना बँक व ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांच्याबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या, तर अन्य आठ बँकांनी दिलेले उत्तर समाधान करणारे असले तरी त्यांना सावधगिरीचा इशारा रिझव्‍‌र्ह बँकेने दिला आहे.

 

Story img Loader