रिझव्‍‌र्ह बँकेने तिमाही पतधोरणात पाव टक्का दर वाढविला असला तरी व्यापारी बँकांनी मात्र तूर्त थांबण्याचा मनोदय जाहीर केला आहे. महागाईबरोबरच ठेवींचा ओघ आगामी कालावधीत कसा राहील, यावरच व्याजदर वाढविण्याचे पाऊल उचलले जाईल, असे प्रमुख बँकांनी म्हटले आहे. व्यापारी बँकांचे गृहकर्ज व्याजदर तूर्त वार्षिक १० टक्क्यांच्या पुढेच आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या यापूर्वीच्या स्थिर व्याजदर धोरणानंतर स्टेट बँकेसह निवडक बँकांनी मर्यादित कालावधीतील व्याजदरातील सूट योजना जाहीर केली होती.
*कर्ज अथवा ठेवींवरील व्याजदर वाढविण्याच्या निर्णयाबद्दल बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विचार होईल. मात्र तूर्त त्याबाबत काहीही पाऊल उचलले जाणार नाही. आगामी कालावधीत महागाई कशी राहते आणि बँकांच्या खर्चाचे प्रमाण कसे असेल यानंतरच निर्णय घेतला जाईल.
अरुंधती भट्टाचार्य, स्टेट बँकेच्या अध्यक्षा.
*महागाईबरोबर ठेवींचा प्रवास कसा राहतो हेही आगामी कालावधीत पाहावे लागेल. त्याचाही परिणाम हा बँकेच्या खर्चावर होऊ शकतो. आणि त्यावरच कर्ज व्याजदराची निर्भरताही. त्यामुळे व्याजदर वाढविण्याबाबत आता लगेच निर्णय घेणे चुकीचे ठरेल.
चंदा कोचर, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका
* रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर व्यापारी बँकांना कर्जाला ग्राहकांकडून कशी मागणी राहते याकडे पाहावे लागेल. त्याचबरोबर ठेवींकडे खातेदारांचा ओघ कसा राहतो, हेही महत्त्वाचे ठरेल. एकूण कर्ज आणि ठेवी यावरच भविष्यातील व्याजदर वाढीचा निर्णय अवलंबून असेल.
आदित्य पुरी, एचडीएफसी बँकेचे मुख्याधिकारी