रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणात व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाईचा चढता आलेख पाहता रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता कमीच असल्याचे याआधीच वर्तविण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. बॅंकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह सर्वच प्रकराच्या कर्जांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.
याच महिन्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी पदभार स्वीकारला. गव्हर्नर म्हणून राजन यांनी आपले पहिले पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात रेपो दरात पाव टक्क्याने वाढ करण्यात आल्यानंतर तो आता ७,५ टक्के झाला आहे. रोकड राखीव निधी प्रतिदिन ९९ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत रोकड स्वरुपात ठेवण्यास बॅंकांना सूट देण्यात आली आहे. चलनवाढीची स्थिती चिंताजनकच आहे. त्यामुळे व्याजदरात कपात करण्यासारखी स्थिती नाही, असे बॅंकेने स्पष्ट केले.
रोकड राखीव निधीच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नसून तो चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणाचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५०० अंशानी पडला. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाचीही ६९ पैशाने घसरण झाली. 

Story img Loader