अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी तिमाही पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेतला. या वाढीमुळे रेपो दर ७.५० टक्क्यांवरून ७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. बॅंकेच्या या निर्णयामुळे गृहकर्जासह इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. दरम्यान, रिझव्‍‌र्ह बँकेकडून सर्व बँका ज्या दराने अल्पावधीसाठी कर्ज घेतात तो दर एमएसएफ पाव टक्क्याने कमी करण्यात आला आहे. यामुळे बँकांची रोकड चणचण कमी होणार आहे. 
तिमाही पतधोरण आढाव्याच्या पूर्वसंध्येला रिझर्व्ह बॅंकेने महागाई वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचवेळी व्याज दरवाढीचे संकेतही दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी रेपो दरात वाढ करण्यात आली. बॅंकेने रोख राखीव निधीत कोणताही बदल केलेला नाही. रोख राखीव निधीचा दर चार टक्के कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या आढाव्यात रोख राखीव निधीचे प्रमाण कमी केले होते. यावेळी ते कायम ठेवण्यात आले. चालू वर्षात आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यताही बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली.

Story img Loader