रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का केलेली दर कपात ही स्वागतार्ह असून ती अर्थव्यवस्थेत सकारात्मक कल बदल करेल; शिवाय महागाई व चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणही साध्य होईल, असा विश्वास देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी व्यक्त केला.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या पतधोरणावर प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यन म्हणाले की, चालू वर्षांत तिसऱ्यांदा दर कपात झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था सावरत असताना पतधोरणाच्या माध्यमातून असा पाठिंबा हवाच होता. यामुळे येत्या कालावधीत महागाईही कमी होईल; शिवाय चालू खात्यावरील तुटीवरही नियंत्रण राखण्यात यश मिळेल. यंदा कमी मान्सूनबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाबाबत ते म्हणाले की, कमी मान्सूनच्या अंदाजानंतर उद्भवणाऱ्या महागाईच्या जोखीमेवर सरकार उपाय करेल. खाद्यान्नाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी पुरवठय़ावर भर दिला जाईल. महागाई व देशातील अन्नधान्य उत्पादनाबाबत गेल्या वर्षीही बिकट स्थिती उद्भवली होती, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader