रिझव्र्ह बँकेकडून येत्या १ एप्रिलला नियोजित वार्षिक पतधोरण आढाव्यात व्याजाचे दर आहे त्याच स्तरावर कायम राहतील, असा विविध बँकांच्या प्रमुखांनी कयास व्यक्त केला आहे.
किरकोळ किमतींवर आधारित महागाईदरातील उताराकडे पाहता, रिझव्र्ह बँकेकडून यंदा हा घटक लक्षात घेऊन व्याज दरवाढ होणार नाही, असे मत एचएसबीसीच्या भारतातील प्रभारी नैना लाल किडवई यांनी व्यक्त केले. महागाईदराव्यतिरिक्त रुपयाची बळकटी आणि त्याने निर्यातीवर साधलेला सुपरिणाम या गोष्टीही रिझव्र्ह बँकेकडून विचारात घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
रिझव्र्ह बँकेने सप्टेंबर २०१३ पासून सलग तीन वेळी रेपो दरात प्रत्येकी पाव टक्क्यांची वाढ केली आहे. जानेवारी २०१४ अखेर पतधोरण आढाव्यात रेपो दर आठ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. तथापि फेडरल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्याम श्रीनिवासन यांनीही रिझव्र्ह बँकेकडून या वेळी दरवाढीला विराम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. आर. कामथ यांच्या मते, रिझव्र्ह बँकेची कोणतीही कृती ही नजीकच्या काळातील महागाई दराविषयक दृष्टिक्षेपावर अवलंबून असेल. मे महिन्यात देशाच्या अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अन्नधान्याच्या किमतीवरील संभाव्य परिणामांचे रिझव्र्ह बँकेचे आकलन पाहायला हवे, असे त्यांनी सूचित केले. नजीकच्या भविष्यात अन्नधान्याच्या किमतीत अस्थिरतेचे कयास मॉर्गन स्टॅन्ले या वित्तसंस्थेने बांधले असून, ग्राहक किमतीवर आधारित महागाईदरावर त्याचे विपरीत सावट पडून तो पुन्हा ८.५ टक्क्यांवर जाण्याचे भाकीत केले आहे. परंतु तो डिसेंबपर्यंत मात्र ६.५ टक्क्यांवर स्थिरावेल, असे त्यांनी सांगितले.
‘दरवाढीचा आणखी भार अनेक कंपन्यांसाठी कडेलोट ठरेल’
मुंबई: रिझव्र्ह बँकेकडून नजीकच्या काळात आणखी पाव ते अध्र्या टक्क्यांची वाढही आघाडीच्या ५०० कंपन्यांपैकी जवळपास १५ टक्के कंपन्यांचा ताळेबंद बिघडविणारी आणि त्यांना कर्ज-थकीताच्या कडेलोटावर ढकलणारी ठरेल, असे इंडिया रेटिंग्ज अॅण्ड रिसर्चच्या अहवालाने प्रतिपादन केले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध आणि ‘बीएसई ५००’ निर्देशांकात सामील कंपन्यांच्या आर्थिक वर्ष २०१३-१४ मधील नऊ महिन्यांच्या आर्थिक ताळेबंदाच्या निरीक्षणाअंती, इंडिया रेटिंग्जने या ५०० पैकी १६ कंपन्या या वित्तीय ताणाने ग्रस्त अथवा न पेलवणाऱ्या ताणाच्या दिशेने अग्रेसर असल्याचा निष्कर्ष मांडला आहे. बँकिंग व्यवस्थेत कर्जे आणखी पाव ते अर्धा टक्क्यांनी महागणे मात्र त्यांना सोसवणारे ठरणार नाही, असाही तिचा निष्कर्ष आहे. जवळपास सर्वच खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जवितरणासाठी आधार दर (बेस रेट) सप्टेंबर २०१३ पासून ०.२५ ते ०.३० टक्के वाढला असल्याकडे तिने लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा