बहुतांशांनी बाळगलेल्या आशा-अपेक्षांच्या विपरीत रिझव्‍‌र्ह बँकेचे नवे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शुक्रवारी आपल्या पहिल्या पतधोरणात अनपेक्षितपणे कर्जावरील हप्त्यांचा भार आणखी वाढेल, असा सर्वसामान्यांना आघात दिला आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांवर गृहकर्ज, वाहन कर्जे आणि अन्य ग्राहक कर्जावरील हप्त्यांचा वाढीव भार येणार आहे.  
जवळपास दोन वर्षे जैसे थे स्थितीवर असलेल्या रेपो दरात म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेकडून वाणिज्य बँकांना अल्पमुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या दरात पाव टक्क्याने वाढ करीत ते ७.५० टक्क्यांवर नेत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या मध्य-तिमाही पतधोरणाच्या आढाव्यात स्पष्ट केले. याचा परिणाम म्हणून सणासुदीच्या तोंडावर वाढणारी मागणी लक्षात घेऊन किरकोळ ग्राहक कर्जावरील व्याजाचे दर अपरिहार्यपणे वाढवावे लागतील, अशी लागलीच प्रतिक्रिया स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी व्यक्त केली.
स्टेट बँकेने एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारीच गृह कर्ज व वाहन कर्जावरील व्याजाचे दर प्रत्येकी ०.२० टक्क्याने वाढविले आहेत आणि यापुढे त्यात आणखी वाढीचेही संकेत दिले आहेत. यापूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने ऑक्टोबर २०११ मध्ये पाव टक्क्याने वाढ केली होती, तर ३ एप्रिल २०१३ पासून रेपो दर ६.२५ टक्के असा स्थिर होता.
डॉ. राजन यांनी महिन्याच्या सुरुवातीला रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉलरच्या तुलनेत ७० पर्यंत घसरलेला रुपया सावरला आणि एकंदर नकारात्मक बाजारभावनेलाही उत्साही कलाटणी मिळाली. त्यामुळे व्याजदराबाबत संवेदनशीलता दाखवत ते सकारात्मक निर्णय घेतील, अशी तमाम अर्थविश्लेषकांची अपेक्षा होती.
ज्या अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या कौलाची प्रतीक्षा मध्यवर्ती बँक करत होती, तोही भारताच्या हिताचा आल्यानंतर तर व्याजदर कपात झाली नाही तरी ती वाढणार निश्चित नाही, अशीही अटकळ होती. तिला तिलांजली देताना राजन यांनी शुक्रवारी वाणिज्य बँकांसाठीचे अल्प मुदतीचे कर्ज अर्थात रेपो दर पाव टक्क्याने महाग केले. मध्यवर्ती बँकेने तब्बल दोन वर्षांनंतर रेपो दर वाढवत तो ६.५० टक्के असा केला आहे.
गव्हर्नर राजन यांनी मात्र रेपो दरात वाढीचा परिणाम हा रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांची रोकड चणचण दूर करण्यासाठी घेतलेल्या उपायांमुळे सौम्य होईल असे नमूद केले आणि बँकांकडून कर्जे महागणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. बँकांनी भविष्याबाबत कल्पित अंदाज बांधू नयेत आणि वास्तविक पायावरच निर्णय घ्यावा, असे आर्जव केले आहे.
उद्योगक्षेत्र, स्थावर मालमत्ता क्षेत्र आणि वाहन उद्योगाने रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या पवित्र्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करणारी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांकडून मागणीत वाढ होईल, अशा उत्साही घोषणेची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात बाजारभावनेला हानी पोहचेल असा निर्णय घेतल्याची टीका उद्योगक्षेत्राने केली आहे.