देशातील खासगी क्षेत्रातील तीन आघाडीच्या बॅंकांनी काळ्या पैशाचे पांढऱया पैशात रुपांतर केल्याचा आरोप रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी फेटाळला. अशा पद्धतीचे कोणतेही व्यवहार देशातील बॅंकांमध्ये होऊ नयेत, म्हणून निर्दोष व्यवस्था अंमलात असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात ‘कोब्रापोस्ट’ या वृत्तसंकेतस्थळाने आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि ऍक्सिस या तिन्ही बॅंकांमध्ये काळ्या पैशाचे पांढरया पैशात रुपांतर करून दिले जाते, असा आरोप स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केला होता. ‘कोब्रापोस्ट’ने या तिन्ही बॅंकांच्या विविध शाखांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ संकेतस्थळावर ठेवण्यात आले होते. त्यानंतर या आरोपांची बॅंकांनी अंतर्गत चौकशी सुरू केली होती. रिझर्व्ह बॅंकेनेही या बॅंकांची चौकशी करण्याचे जाहीर केले होते.
स्टिंग ऑपरेशनमध्ये काळ्या पैशाचे पांढऱया पैशात रुपांतर झाल्याचे एकही उदाहरण चित्रीत झालेले नाही. केवायसी (नो युवर कस्टरम) नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले असले, तरी ते कोणत्याही व्यवस्थेत होऊ शकते. बॅंकेच्या व्यवहारातील उणीवा स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाल्या असून, त्याचा काळ्या पैशाचे पांढऱया पैशात रुपांतर करण्याशी कसलाही संबंध नसल्याचे बॅंकेचे डेप्युटी गर्व्हनर के.सी. चक्रवर्ती यांना पत्रकारांना सांगितले.
‘कोब्रापोस्ट’ आरोप करीत असलेला कोणताही घोटाळा बॅंकांनी केलेला नसून, कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी आपल्याकडे अंमलात असलेली व्यवस्था सर्वोत्तम असून, त्यामध्ये कोणतीही उणीव नाही. त्यामुळे उगाचच बॅंकांकडे बोट दाखवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader