नववर्षांसाठी सुखद आश्चर्याची भेट रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी तमाम कर्जदार, उद्योग क्षेत्राला दिली. उच्चांकी झेप घेणाऱ्या महागाईची डोकेदुखी कायम असताना विकासाकडे रोख वळवत गव्हर्नरांनी स्थिर व्याजदराची मात्रा लागू केली. रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयाचे बँक, वाहन, बांधकाम, उद्योग क्षेत्राने स्वागत केले असून मुंबई शेअर बाजारानेही पतधोरण जाहीर होताच २५० अंशांची उसळी घेत डॉय राजन यांची पाठ थोपटली.
चांगल्या मान्सूनमुळे महागाई दर निश्चितच कमी होईल या आशेच्या जोरावर रोडावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून राजन यांनी मध्य तिमाही पतधोरणात रेपो, रिव्हर्स रेपो, रोख राखीव आदी सर्व दर आहे त्याच स्थितीत कायम ठेवत अर्थविश्लेषकांचा व्याजदरवाढीचा अंदाज धुळीस मिळविला. रेपो दर व रोख राखीव प्रमाण अनुक्रमे ७.७५ व ४ टक्के असे जैसे थे ठेवण्यात आले.
गव्हर्नरपदाच्या कारकिर्दीत सलग तिसऱ्यांदा पाव टक्के रेपो वाढीची अर्थवेत्त्यांचा अंदाज मोडून काढत व्याजदर वाढविण्यासाठी आपल्याला आणखी काही घडामोडींची प्रतीक्षा असल्याचे डॉ. राजन यांनी नमूद केले. पण पतधोरणाव्यतिरिक्तही व्याजदर वाढू शकतात, असे सावध विधानही त्यांनी केले. त्यासाठी गव्हर्नरांची नजर आता अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्ह आणि केंद्र सरकारच्या उपाययोजनांवर असेल.
नोव्हेंबरमधील महागाई दर गेल्या अनेक महिन्यांच्या उच्चांकावर असला तरी आगामी कालावधीत तो कमी होईल, असा विश्वास व्यक्त करीत राजन यांनी तूर्त दरवाढीचे कारण नाही, असे स्पष्ट केले. व्याजदर निश्चितीसाठी फेडरल रिझव्र्हच्या निर्णयाची वाट पाहणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
रिझव्र्ह बँकेच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या कर्जदारांना मात्र संभाव्य व्याजदरवाढीपासून दिलासा मिळाला आहे, तर तूर्त कर्ज व्याजदर स्थिर राहणार असल्याने आर्थिक मंदीतून वाट काढणाऱ्या उद्योगांनीही नि:श्वास सोडला आहे. रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणावर निर्भर असणाऱ्या वाहन विक्री तसेच बांधकाम कंपन्यांनीही डॉ. राजन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सेन्सेक्सनेही व्यवहारादरम्यान ३५० अंशांची वाढ नोंदवून स्थिर व्याजदराला सहमती दर्शविली. रिझव्र्ह बँकेचे आगामी तिमाही पतधोरण २८ जानेवारी २०१४ रोजी आहे.
इन्फ्लेशन इंडेक्स’ बचतपत्रांवर डिसेंबरसाठी १२.५०% व्याज
रिझव्र्ह बँक वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी किरकोळ किमतीवर आधारित (सीपीआय) महागाई दरावर आधारित बचत प्रमाणपत्रांसाठी १२.५०% व्याजाचा दर देणार आहे. रिझव्र्ह बँकेचे धोरण हे नेहमीच घरगुती बचतीस प्रोत्साहन देणारे असेल, असे पतधोरणानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात डॉ. राजन यांनी स्पष्ट केले. राजन यांनी ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या पतधोरणात वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी अशी बचत प्रमाणपत्रे आणण्याची घोषणा केली होती. येत्या दोन दिवसांत त्याला मूर्तरूप देताना रिझव्र्ह बँकेकडून स्वतंत्र परिपत्रक जारी केले जाणे अपेक्षित आहे.
बँकांच्या कर्जथकिताची चिंता नको
वाढत्या बुडीत कर्जाचा बँकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असताना त्याची सध्याची पातळी ही फार काही चिंताजनक नाही, असा निर्वाळा गव्हर्नर डॉ. राजन यांनी दिला. बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी उपाययोजना सुरू असून याबाबत येत्या दोन आठवडय़ांत अंतिम दिशानिर्देश जारी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनुत्पादित मालमत्ता (एनपीए)बाबत चर्चात्मक आराखडा मध्यवर्ती बँकेने पतधोरण पूर्वसंध्येलाच जाहीर केला. त्यावर १ जानेवारीपर्यंत मते घेण्यात येणार असून बँका व कर्जदार यांच्या दरम्यान समिती नेमून सवलती देण्याबाबत विचार सुरू आहे. बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचण्यापूर्वीच पावले उचलली जातील, असेही गव्हर्नरांनी बुधवारी म्हटले. कर्जाची पुनर्रचना करण्याबाबतचा निर्णय संबंधित बँकच घेईल, असेही ते म्हणाले. सप्टेंबर २०१३ तिमाहीत बँकांच्या कर्जथकिताची रक्कम २.३७ लाख कोटी रुपये आहे. विविध पतमानांकन संस्थांच्या अंदाजाने ही रक्कम चालू आर्थिक वर्षअखेर तीन लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. देशातील २६ सार्वजनिक बँकांच्या बुडीत कर्जाचे प्रमाण मार्च २०१४ अखेर वितरीत कर्जाच्या ५%च्या घरात जाण्याची चिन्हे आहेत.
योग्यसमयी उचित मापन
कोणत्याही धोरणात्मक कृतीपूर्वी आणखी सुस्पष्ट आकडेवारीसाठी थांबून रिझव्र्ह बँक वाट पाहील आणि योग्यसमयी उचित मापन करून कृती करेल, असा निर्देश करीत डॉ. राजन यांनी जानेवारीतील आगामी पतधोरणापर्यंत धीर धरला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
काय म्हणाले गव्हर्नर..
*महागाईदराचे विद्यमान आकडे गंभीर जरूर आहेत, पण महागाईतील हा चढ अनिश्चित स्वरूपाचा आहे, त्यामुळे अधिक सुस्पष्ट आकडेवारीसाठी वाट पाहणेच योग्य ठरेल.
*महागाईदराला बांध लागेल आणि भाजीपाल्याचे दर झपाटय़ाने ओसरतील अशी अपेक्षा आहे
*अन्नधान्याच्या किमती उतरण्याची अपेक्षा फलद्रुप ठरली नाही तर रिझव्र्ह बँक सतर्क राहून नियोजित पतधोरणाच्या दरम्यानही कृतीचे पाऊल टाकू शकेल.
व्याजदरात स्थिरतेची नववर्ष भेट!
नववर्षांसाठी सुखद आश्चर्याची भेट रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी बुधवारी तमाम कर्जदार, उद्योग क्षेत्राला दिली.
First published on: 19-12-2013 at 10:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi spares borrowers keeps interest rates unchanged