अपेक्षित व्याजदर वाढीचे संकट दूर गेल्याचे पाहून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात बुधवारी रिझव्र्ह बँकेच्या निर्णयाला पसंतीची पावती दिली. ‘जैसे थे’ मध्य तिमाही पतधोरण जाहीर होताच तब्बल २५० अंशांच्या निर्देशांक उसळीने गव्हर्नर डॉ. राजन यांचे कौतुक करणारा सेन्सेक्स दिवसअखेर २४७.७२ अंशांची भर नोंदविता झाला. २०,८५९.८६ वर स्थिरावताना त्याने गेल्या सहा व्यवहारातील घसरणही मोडीत काढत गेल्या दहा दिवसातील उच्चांक गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ७८.१० अंश वाढीसह ६,२१७.१५ वर पोहोचला.
नोव्हेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक किंमत निर्देशांक गेल्या काही महिन्यातील उच्चांकाला पोहोचल्याने रिझव्र्ह बँक यंदाच्या पतधोरणात किमान पाव टक्का व्याजदर वाढ करेल, या शक्यतेने भांडवली बाजारात गेल्या सहा दिवसांपासून सतत घसरण सुरू होती. या दरम्यान तो तब्बल ७१४ अंशांनी खाली आला होता. बुधवारी पतधोरण जाहीर होण्यापूर्वी किरकोळ वाढीसह व्यवहारास सुरुवात करणारा सेन्सेक्स स्थिर व्याजदराच्या गव्हर्नरांच्या निर्णयाने कालच्या तुलनेत एकदम १४० अंशांनी उंचावला. ही वाढ कायम राहत २५० अंशापर्यंत गेली. व्यवहारात सेन्सेक्स २०,९१७.५७ अशा २१ हजारासमीप पोहोचला. दिवसअखेरही त्यात वाढच नोंदली गेली.
भांडवली बाजारात व्याजदराशी निगडित सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे समभाग उंचावले. यामध्ये बँक, बांधकाम, वाहन, बिगर-बँकिंग वित्तसंस्था यांचा समावेश राहिला. सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व ३० कंपनी समभागांचे मूल्य वधारले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये केवळ एकच नकारात्मक स्थितीत वाटचाल करीत होता.
पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याच्या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी स्वागत करीत विशेषत: बँक समभागांना बुधवारी अधिक मूल्य मिळवून दिले. दिवसभरात २०,८०० पर्यंत गेलेल्या भांडवली बाजारात एकूणच बँक समभागांसह व्याजदराशी निगडित वाहन उत्पादक, बिगर-बँकिंग वित्तसंस्था, बांधकाम कंपन्यांच्या समभागांना मागणी राहिली. १.४० टक्क्यांच्या बँक निर्देशांकासह यातील बँकांचे समभाग ६ टक्क्यांपर्यंत वाढले.
कॅनरा बँक रु.२५८.९५ (+५.३५%)
बँक ऑफ इंडिया रु.२१६.७० (+५.३२%)
युनियन बँक रु.१२०.६० (+४.७८%)
पीएनबी रु.५८९.९० (+४.३१%)
इंडसइंड बँक रु.४३०.०५ (+३.६५%)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा