मुंबई : बहुप्रतीक्षित रिझव्‍‌र्ह बँकेच्या डिजिटल रुपी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) प्रत्यक्षरूप धारण करण्याच्या दिशेने आणखी पुढचे पाऊल पडले आहे. सीबीडीसी अर्थात डिजिटल रुपयाच्या (घाऊक विभाग) पहिला प्रायोगिक वापर हा मंगळवारपासून सरकारी रोख्यांमधील व्यवहारांपासून खुला केला जाणार आहे.   

दुय्यम बाजारातील सरकारी रोख्यांमधील व्यवहारांची पूर्तता (सेटलमेंट) म्हणून डिजिटल रुपीचा वापर या पथदर्शी प्रयोगात सर्वप्रथम खुला होत आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

या पथदर्शी सर्वेक्षणात सहभागासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने नऊ बँका निर्धारित केल्या आहेत. ज्यात, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक मिहद्र बँक, येस बँक, आयडीएफसी फस्र्ट बँक आणि एचएसबीसी अशा प्रमुख सरकारी, खासगी तसेच विदेशी बँकेचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना या नवीन प्रकारच्या चलनाच्या अनुभूतीचा प्रत्यय देणारा, डिजिटल रुपीच्या किरकोळ विभागासाठी पथदर्शी प्रयोग हा एका महिन्याच्या आत ग्राहक आणि व्यापारी यांचा समावेश असलेल्या बंदिस्त वापरकर्त्यां गटांमध्ये निवडक ठिकाणी करण्याची योजना आहे, असेही रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

Story img Loader