बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक थकविणाऱ्या (विलफुल डिफॉल्टर्स) बडय़ा धेंडांना, पैसे उभारण्याचे सर्वच रस्ते बंद व्हायला हवेत, अशी मोर्चेबांधणी रिझव्र्ह बँकेने केली असून, अशा उद्योगांना भांडवली बाजारातूनही निधी उभारण्याला प्रतिबंध केला जावा, अशा कठोर पावलांची ‘सेबी’ या बाजाराच्या नियंत्रकाकडेही मागणी केली आहे.
‘सेबी’ कायद्याच्या अंतर्गत या मंडळींना रोख्यांची विक्री करून व अन्य मार्गाने भांडवली बाजारातून निधी उभारता येतो. मात्र निर्ढावलेले कर्ज थकबाकीदारांना अर्थात विलफुल डिफॉल्टर्सना भांडवली बाजारातही पायबंद घातला जाईल, यासाठी त्यांच्या संदर्भात उपलब्ध माहितीचा तपशील ‘सेबी’लाही विनाविलंब व अद्ययावत स्वरूपात उपलब्ध होईल यासाठी आवश्यक त्या यंत्रणेची रिझव्र्ह बँक चाचपणी करीत आहे. सध्या अशी माहिती सेबीसह ‘सिबिल’सारख्या ऋण संदर्भ संस्थांकडे दर तिमाहीला रिझव्र्ह बँकेकडून पाठविली जाते.
‘सेबी’च्या संचालक मंडळाअंतर्गत या संबंधाने अद्याप चर्चा झालेली नसून, संबंधित सर्व मंडळींचे अभिप्राय आणि विद्यमान नियम-कानूंच्या सर्व पैलूंचा अभ्यास करून या संबंधाने निर्णय घेतला जाईल, असे सेबीच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
कोणत्याही बँक अथवा वित्तसंस्थेने एखाद्या कर्जदाराला ‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणून घोषित केल्यास, ‘सिबिल’व तत्सम ऋण संदर्भ संस्थांनी असे कर्जदाराचे व त्याच्या संबंधाने सर्व तपशील बँकिंग वर्तुळात ताबडतोबीने पसरवायला हवा, अशी अपेक्षाही रिझव्र्ह बँकेने व्यक्त केली आहे.
अशा निर्ढावलेल्या मंडळींना आणखी सार्वजनिक पैशांची लुबाडणूक करण्यापासून रोखण्याबरोबरच, एकूण गुंतवणूकदार समूहाच्या हितरक्षणासाठी सर्व नियंत्रक संस्थांमध्ये माहितीचे विनाविलंब आदान-प्रदानाचा आग्रह रिझव्र्ह बँकेने धरला आहे. सध्याच्या घडीला बँकिंग क्षेत्रात कर्जथकिताचे (एनपीए) प्रमाण दोन लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले आहे. रिझव्र्ह बँक आणि केंद्र सरकारनेही त्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.बँकांनी कर्ज मूल्यांकनाची अंतर्गत यंत्रणा सशक्त बनवावी
तीनच दिवसांपूर्वी डेक्कन क्रॉनिकल्स या सुमारे ४,००० कोटींची कर्ज थकविणाऱ्या समूहाला कर्ज देताना रिझव्र्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याचा निष्कर्ष काढून आयसीआयसीआय, अॅक्सिस बँकेसह १२ बँकांवर दीड कोटी रुपयांचा दंड आकारणारी कारवाई रिझव्र्ह बँकेने केली. कर्ज थकविले जाण्याची जोखीम किमान राहील यासाठी बँकांनी आपली अंतर्गत ऋण मूल्यांकनाची यंत्रणा सशक्त करावी, असा निर्देश रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी मे महिन्यात केला आहे. ‘‘देशात व जगात अन्यत्र अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती पाहता, बँकिंग प्रणालीतील वितरित कर्जाच्या १०.१३ टक्के इतके पुनर्रचित कर्जासह एकूण थकलेल्या कर्जाचे प्रमाण असणे हे निश्चितच शोचनीय आहे,’ असे गांधी यांनी म्हटले होते.
बडय़ा धेंडांचे कृष्णकृत्य!
रिझव्र्ह बँकेकडे उपलब्ध माहितीनुसार, एकूण कर्ज थकितापैकी ५०,००० कोटींच्या घरातील एनपीए हा मोजक्या बडय़ा धेंडांच्या कृष्णकृत्यांमुळे फुगला आहे, असा आरोप बँक कर्मचाऱ्यांची संघटना ‘बीआयएफआय’चे महासचिव प्रदीप बिस्वास यांनी केला. १० कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज घेणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या तर स्थितीवर नियंत्रण मिळविता येऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘कर्जबुडव्यां’विरुद्ध रिझर्व्ह बँकेची मोर्चेबांधणी
बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक थकविणाऱ्या (विलफुल डिफॉल्टर्स) बडय़ा धेंडांना, पैसे उभारण्याचे सर्वच रस्ते बंद व्हायला हवेत, अशी मोर्चेबांधणी रिझव्र्ह बँकेने केली
First published on: 30-07-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rbi suggests sebi action against wilful defaulters